नागपूर - नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाढवे नगरात राहणाऱ्या 55 वर्षीय सुशीला मुळे यांची राहत्या घरीच निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांची हत्या त्यांच्याच मुलाच्या मित्राने केल्याचे पुढे आले आहे. मृत सुशीला याचे पती नागपूर पोलीस दलात कार्यरत असून त्यांची नेमणूक गुन्हे शाखेत आहे. पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीची हत्या झाल्याने शहरात खळबळ माजली आहे. सुशिलाची हत्या केल्यानंतर आरोपी नवीन गोटेफोडे हा पळून गेला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी नवीन गोटाफोडे हा काल मृत सुशीला यांच्या मुलाला भेटण्यासाठी आला होता. त्यावेळी सुशीला यांनी त्यांच्या मुलाला भेटू दिले नाही. त्यामुळे आरोपी नवीन परत गेला. आज तो पुन्हा सुशीला यांच्या मुलाला भेटण्यासाठी आला असताना त्याने सुशीला यांच्यावर चाकूने हल्ला केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला असून सुशीला यांचा मुलगा सुद्धा जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर नंदनवन पोलिसांनी आरोपी नवीनचा शोध सुरू केला आहे. संपूर्ण देश लॉक डाऊन मुळे शांत आल्याने गुन्हेगारी घटनांचा आलेख खाली आला आहे. कोरोनाच्या भीतीमुळे का होईना देशात शांतता नांदत असताना नागपुरात मात्र या लॉक डाऊनच्या काळात 2 खुनाच्या घटना घडल्या आहेत.