नागपूर - उमरेडच्या ब्राम्हणी येथील विवस्त्र डान्स प्रकरणात (Umred Nude Dance) आयोजकांसह १६ आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे, तर कर्तव्य बजावण्यात कमी पडले म्हणून उमरेड पोलीस स्टेशनचे निरीक्षकांची बदली ग्रामीण पोलीस मुख्यालय येथे करण्यात आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, कोणत्याही दोषीची गय केली जाणार नाही, अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Minister Shambhuraj Desai) यांनी दिली आहे. आज गडचिरोली दौरा करून परत आले असता नागपूरच्या विमानतळावर पत्रकारांसोबत बोलताना ही माहिती दिली.
उमरेडनंतर जिल्ह्यात अनेक ठिकाणी विवस्त्र डान्सचे आयोजन झाल्याचा खुलासा झाला आहे. त्यानंतर जिल्ह्यात पेट्रोलिंग वाढवण्याच्या संदर्भात नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांना सूचना देण्यात आल्याची माहिती शंभूराज देसाई यांनी दिली. ग्रामीण भागात बैलगाडा शर्यतीच्या नावाखाली डान्स हंगाम या कार्यक्रमाचे (ऑर्केस्ट्रा) आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अश्लील विवस्त्र डान्स प्रकरण घडले आहे. या संपूर्ण प्रकरणात उमरेड पोलीस ठाण्याचे निरीक्षकांची स्पष्टपणे निष्काळजी दिसून आल्यामुळे पोलीस अधीक्षकांनी त्यांची बदली नियंत्रण कक्षात केली आहे. आयोजकांनी त्या कार्यक्रमांसाठी पोलिसांची कोणतीही परवानगी घेतली नव्हती. अश्लील नृत्याच्या कार्यक्रमासाठी कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांकडून पैसे घेण्यात आले होते अशी माहिती पुढे आल्यानंतर त्याचा तपास केला जाईल, असे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले आहेत.
गडचिरोलीच्या नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेतल्या:-
आज गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी गडचिरोली भागातील ग्रामीण भागाचा दौरा केला. नागरिकांच्या शासनाकडून काय अपेक्षा आहे हे जाणून घेण्यासाठी आज गडचिरोलीतील पोलीस अधीक्षक व इतर अधिकाऱ्यांसह काही ग्रामीण नागरिकांची भेट घेतली आणि त्यांच्या अपेक्षा समजून घेतल्या असल्याची माहिती त्यांनी दिली.
अकोला प्रकरणात कारवाई केली जाईल:-
अकोलामध्ये सराफा व्यावसायिकासोबत पोलीस कस्टडीमध्ये गैरकृत्य झाल्याचा आरोप आहे. त्यामध्ये सकृतदर्शनी आमच्या कर्मचाऱ्यांची चूक दिसून येत आहे. मात्र, चौकशी शिवाय कोणाला दोषी ठरवता येत नाही म्हणून तिथल्या आयजींना चौकशीचे निर्देश दिले आहेत. लवकरच त्यांचा चौकशी अहवाल आमच्याकडे येईल, त्यानंतर दोषींवर निश्चित कारवाई केली जाईल, कोणाचीही गय केली जाणार नाही, अशी माहिती गृहराज्यमंत्री देसाई यांनी दिली.