नागपूर - नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा हे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते. या मार्गाला 'भक्तिमार्ग' अशी ओळख देण्यासाठी रस्त्याचा गौडखैरी ते आदाशापर्यंत विठ्ठल-रुख्मिणी असो कोलबा स्वामी मंदिर आदाशा गणपती यांच्या यात्रा, मंदिराचे सौंदर्यीकरण करताना अंडरपास भिंतीवर चित्र काढून पर्यटनस्थळाला महत्त्व प्राप्त करून देऊ, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari inaugurated Gaudkhairi to Adasa Highway ) म्हणाले. 720 कोटी रूपये खर्चून बनविण्यात आलेल्या गौडखैरी ते सावनेर या 28 किलोमीटर चौपदरीकरण रस्त्याच्या लोकार्पण सोहळ्याच्या प्रसंगी ते धापेवाडा येथे बोलत होते.
धापेवाडा गडकरींचे मूळ गाव - विशेष म्हणजे, धापेवाडा हे गडकरी कुटुंबाचे मूळ गाव आहे. तसेच धापेवाडा विठ्ठल-रुखमाई मंदिरामुळे विदर्भाची पंढरी म्हणून ही ओळखले जाते. माझ्या अनेक जुन्या आठवणी या रस्त्याशी संबंधित आहे. पूर्वी रस्ता चांगला नसल्यामुळे चिखल व्हायचा. रात्री प्रवास करणे कठीण असल्याने पायी यावे लागायचे. आता रस्ता चांगला झाल्याने गावकऱ्यांसह मला ही खूप आनंद होत आहे. मी भावनात्मकरित्या या रस्त्यासोबत जोडलेलो असल्याचे गडकरी म्हणाले. आपण सपत्नीक धापेवाडाला येऊन विठ्ठलाची पूजा करू तसेच आदासाला येऊन गणपतीचे अथर्वशीर्षचे पठण करू, असेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
चंद्रभागेची स्वच्छता ही सर्वांचीच जबाबदारी - गावाच्या चंद्रभागा नदीत गावकरी घाण पाणी सोडायचे. आता आपण या गावात सिवेज ट्रीटमेंट प्लांट सुरू करत असून पाणी स्वच्छ करून नदीत सोडत नदी स्वच्छ करण्याचे काम करणार आहे. गावकऱ्यांनी नदीची काळजी घ्यावी. गाव, नदी स्वच्छ ठेवणे फक्त सरकारचे काम नाही. तर गावातील प्रत्येक नागरिकांची ही जबाबदारी आहे, असे म्हणत गडकरींनी नागरिकांचे कानही टोचले.
वाहतूक होणार वेगवान - या रस्त्यामुळे सुप्रसिद्ध गणेश मंदिर धापेवाडा येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर या स्थळांसाठी यात्रेकरूंना उत्तम कनेक्टिविटी मिळेल. चंद्रभागा नदीवरील नवीन ४-लेन पुलामुळे धापेवाडा येथील ट्रॅफिक जामपासून मुक्तता मिळेल आणि प्रवास सुरक्षित होईल. ६.२ किमीच्या ग्रीनफिल्ड कळमेश्वर बायपासमुळे कळमेश्वर शहरातील वाहतुक सुरळीत व सुरक्षित होईल. गोंडखैरी व चिंचभवन भागातील लॉजिस्टिक व इंडस्ट्रीयल पार्कमध्ये वृद्धी होईल. तसेच भोपाळ, इंदोर येथून मुंबई, हैदराबाद ला ये-जा करणाऱ्या अवजड वाहतुकीपासून नागपूर शहराला मुक्तता मिळेल.
नागपूर जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध - आजच्या लोकार्पण कार्यक्रमादरम्यान गोंडखैरी ते सावनेर सेक्शनमध्ये लाईट लावण्यासाठी ९ कोटी रुपये तसेच पुलाच्या सौंदर्यीकरणासाठी ४० लाख रुपयांच्या निधीला मंजूरी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महामार्ग बांधणीतून नागपूर जिल्ह्याच्या प्रगती आणि विकासाचा मार्ग सूकर करण्यास आम्ही कटिबद्ध असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. यावेळी खासदार कृपाल तुमाने, राज्याचे माजी मंत्री व आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार टेकचंद सावरकर, विठ्ठल मंदिर ट्रस्टचे पोतदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा - Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंच्या 'शिवसंवाद'मुळे बंडखोर आमदारांचे धाबे दणाणले?