नागपूर : बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या पथकाने शहरा लगत असलेल्या खापरी येथे राहणाऱ्या एका महिलेच्या घरी धाड टाकून तब्बल 12 हजार लिटर चोरीचे पेट्रोल जप्त केले आहे. या माध्यमातुन तीने घरातच मिनी पेट्रोल पंप तयार केला होता. पेट्रोलियम डेपो मधून निघालेल्या टँकर मधून काही प्रमाणात पेट्रोल या महिलेला घरी रिकामे केल्यानंतर टँकर पुढच्या प्रवासाला जात असल्याची गुप्त सूचना पोलिसांना मिळाली होती. ज्याच्या आधारे पोलिसांनी पोलिसांनी संबंधित महिलेसह तिघांना अटक केली आहे. मीना द्विवेदी असे त्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी २५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे
77 रुपये लिटरच्या दराने विकायची
एकीकडे पेट्रोलचे दर 110 रुपये प्रति लिटर झाले असताना उपराजधानीत मात्र एका ठिकाणी पेट्रोल केवळ 77 रुपये लिटरच्या दराने मिळत होते. गेल्या अनेक महिन्यांपासून ती महिला पेट्रोलची चोरी करून ते कमी दरात विकत होती. पोलिसांना या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर त्यांनी धाड टाकून 12 हजार लिटर पेट्रोल साठयासह अटक केली आहे. टँकर मधून पेट्रोल चोरल्यानंतर ही महिला चालकांच्या मदतीने त्यात रॉकेल आणि इतर पदार्थांची भेसळ करायची अशी ही माहिती समोर आली आहे.
पेट्रोलचे सर्रास चोरी
विदर्भातील पेट्रोल डेपो मधून रोज शेकडो टॅंकर्स, पेट्रोल घेऊन वेगवेगळ्कया भागात जातात. मात्र तो टँकर पेट्रोल पंपावर पोहोचण्याआधीच टँकर मधून शेकडो लिटर पेट्रोल चोरीला जातो. म्हणजेच पेट्रोल चोरी करणारी ही टोळी रोज हजारो लिटर पेट्रोल चोरी करत आहे.
अशी केली जाते पेट्रोलची चोरी
पोलिसांच्या तपासानुसार वर्धा जिल्ह्यातील पुलगाव तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाली मधून इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या डेपो मधून निघणारे टॅंकर्स वर्धा, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यात काही विशिष्ट ठिकाणी थांबतात. तिथे टँकर चालक काहीशे लिटर पेट्रोल काढून चोरीचे पेट्रोल विकणाऱ्या टोळीच्या हवाली करतात. 22 लिटर ची एक कॅन बाराशे ते पंधराशे रुपये मध्ये या टोळीला विकली जाते. पुढे ही टोळी तीच कॅन सतराशे अठराशे रुपयात विकते. मात्र, ही चोरी करताना पेट्रोलियम कंपनीची टँकरवर बसवलेली दुहेरी सुरक्षा व्यवस्था अचूकपणे निकामी केली जाते.