नागपूर - दिवाळीनंतर कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता राज्य सरकारने यावर्षीही छट पूजा सार्वजनिक स्वरूपात साजरी करता येणार नसल्याचे निर्देश दिले आहेत. नागपूर शहरात गेल्या अडीच महिन्यांपासून कोरोना पूर्णपणे नियंत्रणात आहे. ही सकारात्मक बाब लक्षात घेता यावर्षी नागपूर शहरात छट पूजा सार्वजनिक स्वरूपात साजरी करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती महापौर दयाशंकर तिवारी यांनी मुख्यमंत्रयांकडे पत्राद्वारे केली आहे.
महापौर दयाशंकर तिवारी यांनी पत्रात नमूद केल्यानुसार, मागील वर्षी कोरोनाचा भयावह परिस्थिती लक्षात घेता छटपूजा उत्सव सार्वजनिक स्वरूपात करण्यास बंदी घालण्यात आली होती. यावर्षीसुद्धा हा उत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्यात येणार नाही, यासंदर्भातील पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे. मात्र, नागपूर शहरात कोरोना पूर्णपणे नियंत्रणात आहे. मागील अडीच महिन्यात कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही तर दोन महिन्यांपासून रुग्णांचा दररोजचा आकडा दहाच्या वर गेला नाही. असे असताना नागपूर शहरात छट पूजा साजरी करण्यास बंदी घातल्यास नागरिक नाराज होतील नागपुरातील कोरोनाची परिस्थिती व नागरिकांच्या भावना लक्षात घेता छट पूजेच्या संदर्भाने शासनाने यावर्षी काढलेल्या परिपत्रकातून नागपूर शहराला वगळण्यात यावे, अशी विनंती महापौरांनी पत्राद्वारे केली आहे.
केव्हा आहे छटपूजा..?
यंदा 9 नोव्हेंबरच्या सूर्यास्तापासून ते 10 नोव्हेंबरच्या सूर्योदयापर्यंत छटपूजा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवासाठी मुंबईतील उत्तर भारतीय बांधव मोठ्या उत्साहाने तयारीला लागल्याचे दिसते आहे. मात्र, असे असले तरी कोरोनाचा प्रादुर्भाव विचारात घेऊन गेल्या दीड वर्षांपासून ज्या पद्धतीने सर्वधर्मीयांनी एकत्र न येता उत्सव साजरे केले आहेत. त्याच पद्धतीने उत्तर भारतीय नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता गर्दी न करता उत्सव साजरा करा,वा असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.
हे ही वाचा - दिवाळीच्या तीन दिवसांत नागपूर शहरात दोघांचा खून