नागपूर - शहरातील मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका अरबी भाषेच्या शिक्षकाने स्वतःच्याच अल्पवयीन विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आलेली आहे. रफिक खान उर्फ मौलाना हाफिज (२७) असे आरोपीचे नाव आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
तिला मानसिक आणि शारीरिक त्रास
या प्रकरणातील पीडित अल्पवयीन मुलीची आरोपी रफिक खानसोबत जुनी ओळख आहे. लॉकडाऊनच्या काळात आरोपीने पीडित कुटुंबाची थोडी मदत केली होती, ज्यामुळे त्यांचा आरोपीवर विश्वास बसला होता. आरोपी रफिक हा अरबी भाषा शिकवत असल्याने पीडित तरुणीने त्याच्याकडे शिकवणी लागली होती. आरोपीने पीडित विद्यार्थिनीला तुझ्या कुटुंबाची मदत करणार आल्याचे सांगत जवळीक साधली. त्याने पीडितेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर आरोपी तिला मानसिक आणि शारीरिक त्रास देत असल्याने पीडित तरुणीने सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आरोपीच्या त्रासाला कंटाळून केली तक्रार
आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. मार्च महिन्यात त्याने पीडित तरुणीसोबत साखरपुडा करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र यासंदर्भात बालसुरक्षा अधिकाऱ्यांनी आरोपीचा हा प्रयत्न हाणून पाडला व मुलीची रवानगी बाल सुधारगृहात केली होती. काही दिवस तिथे राहिल्यानंतर तरुणी घरी परत आली, मात्र त्यानंतरसुद्धा आरोपी वारंवार भेटायला बोलवत असल्याने त्याच्या त्रासाला कंटाळून अखेर आरोपीविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली आहे, ज्याच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली.