नागपूर - भारतीय हवामान खात्याने (IMD) विदर्भाकरिता २१ ते २४ सप्टेंबर २०२१ या कालावधीसाठी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून नागपूर जिल्ह्याला २१ व २२ सप्टेंबर या कालावधीसाठी येलो अलर्ट दिला आहे. विदर्भात बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह वीज आणि अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील धरणाची पातळीदेखील भरपूर प्रमाणात झाली असून त्या अनुषंगाने नागरिकांनी विशेषतः शेतकऱ्यांनी आवश्यक खबरदारी व काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
केव्हाही उघडण्यात येवू शकते धरणाचे गेट
आजपासून नागपुरात पावसाने जोर धरला आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील दोन-तीन दिवस नागपुरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नागरिकांसाठी अलर्ट देण्यात आला आहे. धरणक्षेत्रात पडणारा पाऊस आणि आजूबाजूच्या क्षेत्रातून धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्याने पूरस्थिती लक्षात घेता मोठे धरणाचे गेट केव्हाही उघडण्यात येवू शकतात. त्यामुळे नदीक्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.