नागपूर - माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी कट्टर राष्ट्रवादाबद्दल केलेल्या वक्तव्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. हिंदुत्त्व हे नेहमीच सहिष्णू राहिल्याचे फडणवीस म्हणाले. देशाची प्राचीन जीवनपद्धती ही हिंदुत्त्व असल्याचे म्हणत त्यावर भाष्य करणे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली. ते सध्या नागपुरात पदवीधर निवडणुकीच्या प्रचारासाठी दाखल झाले आहेत.
हिंदुत्त्वाने देशाला सहिष्णुता शिकवली आहे. हिंदुंनी कधीही कोणत्याही देशावर हल्ला केला नाही. जगात हिंदू हे कधीच आक्रांत नव्हते. म्हणून सर्व जातीचे सर्व पंथाचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत, असे फडणवीस म्हणाले.
ओवैसींच्या ट्विटवरून वाद
बहुसंख्या हिंदुंच्या देशात ओवैसी हिंदुत्त्वाला खोटं ठरवू शकतात. यानंतर कोणीही त्यांच्यावर हल्ला करत नाही. कारण हिदुत्त्वात सहिष्णुता आहे, असे फडणवीस म्हणाले. कोणीही कोणताही विचार मांडला, तरी त्याचा विचारानेच प्रत्युत्तर देण्याची क्षमता हिंदुत्त्वात असल्याचे फडणवीसांनी अधोरेखित केले. त्यामुळे हैदराबाद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ओवैसीसारख्या नेत्यांनी कोणतेही आक्षेपर्ह विधान केले, तरी त्याच्याकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही, असे फडणवीस म्हणाले. त्यामुळे ओवैसी असो वा कोणी, हिंदुंना काहीच फरक पडणार नाही. त्यांच्यावर कोणीही आघात करू शकणार नसल्याचे फडणवीसांनी सांगितले.
काय म्हणाले हमीद अन्सारी
माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी देशातील धार्मिक कट्टरता आणि वाढत्या आक्रमक राष्ट्रवादावर दिल्लीत वक्तव्य केले. हे दोन्ही आजार असल्याचे त्यांनी म्हटले. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.