नागपूर - राज्यात आणि नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव बराच कमी झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या सूचनेनुसार आजपासून नागपूर जिल्हा प्रशासनाकडून कोरोना नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. त्याअंतर्गत अत्यावश्यक सेवेसह जीवनावश्यक वस्तूंचे दुकान दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहे. नियमांचे सूट देण्यात आली असली तरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नागपुरातील बाजारांमध्ये असलेल्या दुकानांच्या मालकांसह दुकानांमध्ये काम करणारे कर्मचारी आणि ग्राहकांची रॅपिड अँटिजेन चाचणी केली जात आहे.
सर्वांची कोरोनाचाचणी
राज्य सरकारच्या नवीन आदेशानुसार एक जूनपासून अत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी सात ते दोन वाजेपर्यंत सुरू राहतील. इतर दुकानांतही सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते दोन असा वेळ देण्यात आलेला आहे. मात्र दुकानांना परवानगी देताना कोरोनाचा परत उद्रेक होऊ नये, याची खबरदारीदेखील प्रशासनाकडून घेतली जात आहे. त्या अनुषंगाने सर्वांची कोरोनाचाचणी केली जात आहे.
समाधानकारक निकाल
आज सकाळपासून महानगरपालिका प्रशासनाने सीताबर्डी परिसरात येणाऱ्या नागरिकांसह दुकान मालक आणि कर्मचाऱ्यांची कोरोनाचाचणी सुरू केली आहे. यामध्ये एकही नागरिक कोरोनाबाधित असल्याचे आढळून आलेले नाही. यामुळे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनीदेखील सुटकेचा निश्वास सोडला आहे.
योजना चांगली पण संसाधनांची कमतरता
आजपासून अत्यावश्यक सेवेसह जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू करताना कोरोनाला प्रतिबंध घालण्याकरिता बाजारांमध्ये कोरोना रॅपिड टेस्ट केले जात आहे, मात्र टेस्ट करून घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने ऐनवेळी टेस्टिंग किटचा तुटवडा निर्माण झाला होता, ज्यामुळे नागरिकांनी तासभर तत्काळ उभे राहावे लागले, यावर नाराजी व्यक्त केली.