नागपूर - पालिका प्रशासनाने शहरातील वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी दोन दिवसांचा जनता कर्फ्यू पुकारला आहे. २५ व २६ जुलै या दोन दिवसात संपूर्ण शहरात संचारबंदी असणार आहे. याच पार्श्वभूमीवर महापौर संदीप जोशी यांनी जनता कर्फ्युसंबंधी पाहणी दौरा केला. अनावश्यक कारणांसाठी रस्त्यावर किंवा घराबाहेर न पडण्याचे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरात दोन दिवसांची संचारबंदी करण्यात आली. नागपूरकरांकडून या जनता कर्फ्युला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे संदिप जोशी यांनी सांगितले. शहरातील विविध भागात जाणून रस्त्यावर अनावश्यक फिरणाऱ्यांना महापौराकडून आवाहन करण्यात आले.
नागपूरकरांचा असाच प्रतिसाद राहिल्यास कोरोनाची साखळी तोडण्यास नक्कीच यशस्वी होऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले. फक्त दोन दिवसांसाठी प्रतिसाद न दाखवता तो पुढेही कायम ठेवला पाहिजे, असे आवाहन महापौरांनी केले. शहरातील बाजारपेठांमध्ये वाढणारी गर्दी चिंताजनक असल्याचे त्यांनी म्हटले. यापुढे अशी गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे जोशींनी सांगितले.