नागपूर - ओडिसातून रेल्वेने नागपुरात येऊन चोरी करणाऱ्या सराईत चोराला नागपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. प्रशांतकुमार कराड असे या चोराचे नाव असून त्याने शहरात तब्बल 16 ठिकाणी चोऱ्या केल्याचे उघड झाले आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यातही प्रशांत आणि त्याच्या टोळीने चोऱ्या केल्या आहेत. पोलिसांनी प्रशांतकडून 38 लाख रुपये किमतीचे 951 ग्राम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. पोलिसांनी त्याच्या आणखी एका मित्राला अटक केली आहे.
कायदा सुव्यवस्थेबद्दल गंभीर प्रश्नचिन्ह - नागपूर शहरातच्या अनेक भागात गेल्या काही महिन्यांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेषतः प्रतापनगर, बेलतरोडी, जरीपटका पोलीस ठाण्य़ाच्या हद्दीत चोऱ्या आणि घरफोडीच्या घटना वाढल्या होत्या. घरातील नागरिक घरात झोपले असताना देखील चोरीच्या घटना घडत असल्याने उपराजधानीतील कायदा सुव्यवस्थेबद्दल गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होत होता. चोरी आणि घरफोडीच्या अनेक तक्रारी येत असल्याने पोलिसांवर देखील चोराला लवकर जेरबंद करण्यासाठी दबाव वाढला होता. मात्र, अनेक पोलीस स्टेशनचे पथक प्रयत्न करूनही चोरट्यांना जेरबंद करण्यात हतबल ठरत होते.
अखेर चोर लागला पोलिसांच्या हाती - प्रतापनगर पोलीस ठाण्यात दिपाली पातोडे यांनी चोरीची एक तक्रार दाखल केली. त्याचा तपास करत असताना रात्रीच्या वेळी त्रिमूर्ती नगर परिसरात एका घरात चोर शिरल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्या घराच्या अवतीभवती शोध सुरू केला असता त्या घरातून पळून जाताना एक संशयास्पद तरुण पोलिसांच्या नजरेस पडला. त्याला पकडून पोलिसांनी विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तर देत असल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी त्याला खाक्या दखवताच त्याने स्वतःचे नाव प्रशांत कुमार कराड असे सांगत चोरीची कबुली दिली.
ओडिसामधून येऊन करायचा चोऱ्या - प्रशांतकुमार हा ओडिसामधील गंजम जिल्ह्यातील राहणारा असून तो रेल्वेने ओडिसामधून नागपुरात यायचा. रात्री उशिरा तो मनीष नगर, बेलतरोडी प्रताप नगर, त्रिमुर्ती नगर, स्वावलंबी नगर या परिसरात मोठ्या बंगल्यांमध्ये शिरून चोऱ्या करायचा. त्यानंतर प्रशांत पहाटे पुन्हा रेल्वे स्टेशन गाठून रेल्वेने महाराष्ट्राच्या बाहेर निघून जायचा.
कुठे कुठे केल्या चोऱ्या - पोलिसांनी केलेल्या चौकशीत प्रशांत कराडने नागपुरात तब्बल 16 घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. त्याशिवाय त्याने ओडिसामधील गंजम आणि भुवनेश्वर जिल्ह्यात तसेच छत्तीसगड आणि तामिळनाडूमध्येही अनेक घरफोड्या केलेल्या आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 971 ग्राम सोन्याचे दागिने जप्त केले आहे.
चोरीच्या पैशातून ऐश - प्रशांत कराड या सगळ्या चोऱ्या एकटाच करत असल्याने आजवर त्याची कोणतीही माहिती महाराष्ट्रातील पोलिसांकडे नव्हती. त्याचा श्रीकांत शेट्टी नावाचा एक सहकारी चोरलेल्या मुद्देमालामधून सोन्याचे दागिने विकण्यास मदत करायचा. प्रशांत कराड घरफोडी करून चोरलेल्या मुद्देमालातून सोन्याचे दागिने श्रीकांत शेट्टीच्या हवाली करायचा आणि त्यानंतर शेट्टी त्यास वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन विकायचा. सोने विकून मिळणाऱ्या रकमेतून दोघे रायपूरमधील एका चांगल्या कॉलनीत घर भाड्याने घेऊन आरामाची जिंदगी जगत होते. प्रत्येक मोठ्या चोरीनंतर महागडी दारू, मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन पंच पक्वान्न खाण्याची दोघांची जीवनपद्धती होती. पोलिसांनी प्रशांतकडून 971 ग्राम सोन्याचे दागिने असा एकूण 38 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.