नागपूर - ग्रामपंचायतने नेमून दिलेल्या शिक्षक मित्राने घरीच भरवलेल्या वर्गात चौथ्या वर्गात शिकणाऱ्या १० वर्षाच्या गाथा नावाच्या विद्यार्थीनीला येण्यास उशीर झाल्यामुळे संतापलेल्या त्या महिला शिक्षक मित्राने त्या चिमुकलीला अमानुष मारहाण करत २०० उठा-बशा काढायला लावल्या. ज्यामुळे गाथाची तब्येत खालावली आहे. ही घटना नागपूर जिल्ह्याच्या भिवापूर तालुक्यातील नांद/बेला पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या महालगाव येथे घडली आहे. सध्या गाथावर नागपूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून ती मानसिक तणावात असल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक, वर्गशिक्षक आणि शिक्षक मित्र असलेल्या त्या महिलेविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
10 ते 12 छड्या मारल्यानंतर 200 उठा-बशांची शिक्षा
कोरोनाप्रादुर्भाव वाढल्यापासून शाळा बंद कराव्या लागल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिवाय ऑनलाइन शिक्षण सुद्धा ग्रामीण भागात फारसं उपयुक्त ठरत नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, या करिता भिवापूर तालुक्यातील महालगाव ग्रामपंचायतने गावातील शिक्षित तरुण आणि तरुणींची शिक्षण मित्र म्हणून निवड केली. चौथ्या वर्गाला शिकवण्याची जबाबदारी ही आंचल कोकाटे या तरुणीकडे देण्यात आली होती. आंचल कोकाटे यांनी आपल्या घरीच वर्ग भरवला होता, ज्यामध्ये पीडित विद्यार्थीनी गाथाला पोहोचण्यासाठी उशीर झाला, ज्यामुळे चिडलेल्या आंचल कोकाटे यांनी तिच्या हातावर १० ते १२ छड्या मारल्या, एवढ्यावर न थांबता त्या महिला शिक्षक मित्राने त्या चिमुकलीला तब्बल २०० उठा-बशा काढण्याची शिक्षा दिली.
चिमुकलीवर सेवाग्रामनंतर आता नागपुरात उपचार सुरू
कोवळ्या वयात २०० उठा-बशा कढल्याने गाथाची तब्येत खालावली आहे. सुरुवातीला वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट, सेवाग्राम येथे उपचार केल्यानंतर आता गाथावर नागपुरात उपचार सुरू आहेत. गाथा सध्या प्रचंड मानसिक दडपणाखाली आहे. तिच्या छातीत दुखणे सुरू असून श्वास घ्यायला त्रास होत असल्याची माहिती समोर आली आहे. गाथावर सध्या मेंदूरोग तज्ज्ञ उपचार करत आहेत.
हेही वाचा - मृत्यूची दरड : स्वप्नांची राखरांगोळी झाल्यानं नागरिकांचा आक्रोश, अनेक कुटुंब उद्ध्वस्त