नागपूर - नागपुरात आज पोलीस भवनाच्या नवीन अद्ययावत इमारतीचे उद्घाटन केले जाणार आहे. ११० कोटी रुपये खर्च करून तयार झालेल्या या भव्य इमारतीच्या उद्घाटन पत्रिकेवरून वाद रंगला आहे. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून पोलीस भवन इमारतीचे भूमीपूजन करण्यात आले होते. चार वर्षांच्या कालावधीनंतर ही इमारत तयार झाली आहे. उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेत देवेंद्र फडणवीस यांचं नाव प्रमुख पाहुण्यांमधून वगळून उपस्थितांमध्ये टाकण्यात आल्याने भाजपच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
एकाच इमारतीत सर्व कार्यालये - मार्च 2018 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पोलीस भवनाचे भूमिपूजन करण्यात आले. चार एकर जागेवर निर्मित या पोलीस भवनासाठी 110 कोटी रुपये खर्च आला आहे. सात मजली इमारती मध्ये १.६० लाख चौरस फूट चटई क्षेत्र आहे. ए विंग मध्ये पोलीस आयुक्तालय तर बी विंग मध्ये नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक कार्यालय असणार आहे. सोबतच परिमंडळाचे पाच पोलीस उपायुक्त सोडून सर्वच पोलीस उपायुक्त यांचे कार्यालय या एकाच इमारतीमध्ये असणार आहे.
फडणवीस यांचा महाविकास आघाडीला द्वेष - २०१८ मध्ये नागपूर येथे ११० करोड रू किंमतीच्या पोलीस भवनाला निधी मंजूरी उपलब्ध करून देणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव उद्घाटन पत्रिकेत उपस्थितांमध्ये कोठेतरी छापून महाविकास आघाडीने त्यांचा अपमान केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या द्वेष महाविकास आघाडी सरकारने मांडलेला असल्याचा आरोप भाजप प्रदेश सचिव ॲड धर्मपाल मेश्राम यांची केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात भूमिपूजन झालेल्या विकास कामांचे उद्घाटन करण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करत आहे. त्यातही ज्यांच्या संकल्पनेतून विकास कामे झाली आहे, त्याचेच नाव उपस्थितीतांमध्ये टाकून महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांच्या डोक्याची नापिकी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
निमंत्रण पत्रिकेचा निषेध - राज्यातील पोलीस दलाच्या इमारतींपैकी सर्वाधिक सुसज्जित अशी ही इमारत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकरिता विशेष प्रयत्न केले होते. मात्र आजच्या उद्घाटन सोहळ्याच्या पत्रिकेत देवेंद्र फडणवीस यांचे नाव उपस्थितांमध्ये छापले आहे. यावर तीव्र नाराजी व्यक्त करत विधान परिषदेचे सदस्य प्रवीण दटके यांनी निषेध नोंदवला आहे.
हेही वाचा - Shiv Sena criticizes Modi: मोदींना केंद्र व राज्यांतील संघर्षाचा भडका हवा आहे!