नागपूर - पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिची चार वर्षांच्या चिमुकलीपुढे हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे. पती आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असे, त्यातूनच त्यांच्यात मंगळवारी पहाटे वाद झाला. रागाच्या भरात पतीने घरातील सुरीनी बायकोवर वार करत तिची हत्या केली. या प्रकरणी नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
नंदनवन परिसरातील हिवरी नगर भागात ही घटना घडली आहे. मृत महिलेचे नाव श्रुती भुजाडे असे आहे. तर तिचा पती आरोपी विलास भुजाडे या पोलिसांनी अटक केली आहे. आईवडीलांचा गोंधळ ऐकूण मुलगी जागी झाली तेव्हा तिच्या डोळ्यांसमोर वडिलांनी तिच्या आईचा खून केला होता. त्यानंतर या चिमुकलीने तिच्या काकाला तिथे आणले.
हेही वाचा... बारामतीत तरुण पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
श्रुती आणि विलास यांच्यात नेहमीच छोट्या-छोट्या कारणांवरून वाद होत असे. आरोपीच्या मते श्रुती नेहमीच कोणासोबत तरी फोनवर बोलत असायची. त्यावरून विलास हा श्रुतीवर संशय घ्यायचा. याच कारणावरून या दोघांमध्ये अनेक वेळा वाद झाले होते. सोमवारी रात्री सुद्धा दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर मंगळवारी पहाटे दोघांमध्ये पुन्हा शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. त्यानंतर आरोपी विलासने श्रुतीवर चाकूने वार केले.
हा संपूर्ण घटनाक्रम श्रुतीच्या चार वर्षीय मुलीने आपल्या काकाला जाऊन सांगितला. मात्र, तोपर्यंत श्रुती यांचा जीव गेला होता. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहचून आरोपीला अटक केली.