नागपूर - गोकुळपेठ येथील 16 वर्षीय तरुण संपूर्ण कुटुंबाचा आधार बनला आहे. लॉकडाऊन काळात त्याच्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले होते, मात्र त्याची मूर्ती निर्मितीची कला ही त्याच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनली आहे. वैभव छगनलाल फरकुंडे असे या तरुण मुलाचे नाव असून त्याने तयार केलेल्या मूर्तींना प्रचंड मागणी आहे.
हेही वाचा - कुठल्याही अडचणीत सरकार जनतेच्या पाठीशी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
वैभव बालपणापासूनच हौस म्हणून घरातील झाडांच्या कुंडीतील मातीच्या मदतीने गणपती तयार करायचा. ज्यावेळी कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले तेव्हा त्याच कलेला त्याने आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन बनवले. मूर्ती तयार करण्याचे कोणतेही प्रशिक्षण न घेता किंवा घरी मूर्ती तयार करण्याचा कुणालाही पूर्व अनुभव नसताना देखील वैभवने दाखवलेल्या जिद्दीमुळे आज त्याने तयार केलेल्या मूर्तींना मोठी मागणी आली आहे.
वैभवच्या संघर्षात बाप्पा ठरला पाठीराखा
वैभवाच्या घरी आई, वडील आणि दोन बहिणी, असे पाच सदस्य आहेत. दोन वर्षांपूर्वी सर्वकाही सुरळीत सुरू असताना कोरोना प्रादूर्भावामुळे केंद्र सरकारने सुरक्षेचा उपाय म्हणून टाळेबंदी लावली. यात वैभवच्या आई वडिलांचा रोजगार गेला. त्यावेळी वैभवचे वय १४ वर्षे इतकेच होते. घरात होते नव्हते तेवढे अन्य धान्य संपायला लागल्यानंतर वडिलांची हतबलता त्याला बघवत नव्हती. जवळ ठेवलेले पैसे देखील संपल्यानंतर मित्रांकडून काही पैसे उधार घेऊन वैभवने शाडू माती विकत आणली आणि त्यातून काही गणेश मूर्ती तयार केल्या.
गेल्यावर्षी बाप्पाची मूर्ती मिळणाऱ्या चितारओळीत जाणे शक्य नसल्याने नागरिकांनी वैभवने तयार केलेल्या मूर्ती विकत घेतल्या. मूर्तींची सौदर्य, सुबकता आणि रंगसंगती बाप्पाच्या भक्तांना भावली, ज्यामुळे त्याला मागील वर्षी चांगला आर्थिक लाभ झाला. यावर्षी सुद्धा वैभवच्या मूर्तींना मोठी मागणी असून त्याला बाप्पाचं पावला, असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही.
स्कल्पचर आर्टचे शिक्षण घेण्याची इच्छा
वैभव यावर्षी बारावीत आहे. भविष्यात फाईन आर्ट अभ्यासक्रमातील स्कल्पचर आर्ट या विषयाचे शिक्षण घेण्याचा त्याचा मानस आहे. परिस्थितीने साथ दिल्यास स्कल्पचर आर्टिस्ट म्हणून नाव मिळवेल आणि कुटुंबाची आर्थिक स्थिती आणखी मजबूत करेल, असा विश्वास त्याने बोलून दाखवला.
हेही वाचा - प्रेम प्रकरणातून २७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; एकाला अटक तर दोघांचा शोध सुरू