नागपूर - गेल्या 24 तासात विदर्भातील अनेक जिल्ह्यांच्या तापमानात अचानक 3 ते 4 डिग्रीची वाढ झाली आहे. त्यामुळे चंद्रपूर आणि वर्धा जिल्हाचे तापमान 45 डिग्री पर्यंत पोहचले आहे तर अनेक जिल्हे सुद्धा 45 डिग्रीच्या जवळ असल्याने नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने विदर्भात अति-उष्णतेची लाट ( Heat Wave in vidarbha ) आली असल्याचे सांगितले आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे तापमानात वाढ झाली असून पुढील काही दिवस कोणताही दिलासा मिळण्याची शक्यता नसल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
अनेक जिल्ह्याचे तापमान 45 डिग्रीच्या पुढे - गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे तापमानात काहीसा दिलासा मिळाला होता,मात्र हा आठवडा सुरू होताच सुरू पुन्हा तापायला लागला असल्याने अनेक जिल्ह्याचे तापमान 45 डिग्रीच्या पुढे गेले आहे. दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत असल्याने आता कुलर देखील उपयोगाचे नसल्याचं दिसत आहे. तापमान वाढीमुळे दुपारी रस्ते निर्मनुष्य झाले आहेत,पुढील काही दिवस सूर्याचा प्रकोप कायम राहणार असल्याने नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. दुपारच्या वेळेस तापमान सर्वाधिक असल्याने नागरिकांनी दुपारी उन्हात निघणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
मार्च महिन्यापासूनच तापमानात वाढ - यावर्षी मार्च महिना सुरू होताच तापमान वाढीस सुरुवात झाली होती, एप्रिल महिन्यात तर जुने सर्व रेकॉर्ड मोडीत निघतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 2019 मध्ये विदर्भातील अनेक जिल्हाचे तापमान 47 डिग्रीच्या वर गेले होते, यावर्षी त्यापेक्षा जास्त तापमान वाढण्याची भीती व्यक्त केली जाते आहे.
हेही वाचा - Today Weather In MH : राज्यात ढगाळ वातावरण; जळगाव जिल्ह्यात नोंदवले सर्वाधिक तापमान