नागपूर - नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिवळा फाटा परिसरात राहणारे राजू वैद्य यांच्या घरी चाकू आणि बंदूक घेऊन एक माथेफिरू आरोपी शिरला होता. त्या गुंडाने चाकू आणि शस्त्राच्या धाकावर वैद्य कुटुंबियांना तब्बल तीन तास ओलीस ठेवले होते. आरोपीने वैद्य कुटुंबियांकडे ५० लाख रुपयांची खंडणी मागितली होती.
या संदर्भात पोलीस विभागाला माहिती समजताच हुडकेश्वर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते, या शिवाय गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या सह अनेक मोठे अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले. सुमारे तीन तासांच्या प्रयत्नांनंतर पोलिसांनी आरोपीला सिनेस्टाईल पद्धतीने अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीच्या नावाचा खुलासा केलेला नाही. शिवाय वैद्य यांच्या घरात शिरण्यामागील कारण पोलीस जाणून घेत आहेत.
पिपळा फाटा या परिसरात राहणारे राजू वैद्य यांच्या कुटुंबियांवर हा प्रसंग ओढवला होता. सुमारे तीन तास हे ओलीस नाट्य सुरू होते. राजू वैद्य हे बांधकाम व्यावसायिक आहेत. दुपारी अडीचच्या सुमारास आरोपी बंदूक आणि चाकु घेऊन त्यांच्या घरात शिरला. त्याने वैद्य कुटुंबियांतील 6 जणांना घरात ओलीस ठेवले. त्यानंतर 50 लाख रुपयांची खंडणी मागितली. दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यावर पोलिसांनी आरोपीला अटक करण्यासाठी नियोजन केले. वरच्या माळ्यावरून घरात शिरत आगोदर तीन जणांची सुटका केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला सिनेस्टाइल अटक केली. लुटारूला गाफील ठेवण्यासाठी आणि त्याने घरच्यांना इजा करू नये यासाठी सुरुवातीला लुटारूला तीनदा खंडणी म्हणून दोन लाख रुपये दिले. दरम्यान पोलिसांना वेळ मिळाला आणि त्याच्या अंगावर जाळी टाकून अटक केली. आता या आरोपीची चौकशी सुरु आहे.
पोलिसांच्या कौशल्याचे कौतुक -
नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पिपळा फाटा हा परिसर एका गुंडाने घातलेल्या धुडगुसामुळे हादरून गेला आहे, एवढंच नाही तर ज्या कुटुंबाला या आरोपीने बंदूक आणि चाकूच्या धाकावर ओलीस ठेवले होते, त्यांची सुटका पोलिसांनी फिल्मी स्टाईलने केल्याने अक्षरशः अंगावर काटा उभा रहावा असा थरार या भागातील नागरिकांनी अनुभवला आहे. पोलिसांनी आपले संपूर्ण कौशल्यपणाला लावून वैद्य कुटुंबातील कुणालाही इजा न होऊ देता आरोपीला जेरबंद केल्याने मोठा अनर्थ टळला आहे.