नागपूर - गणेशोत्सव सुरू होण्यासाठी अवघे काही तासच शिल्लक आहेत. वर्षभराच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन होत असल्याने बाजारात गणेशोत्सवाचा उत्साह संचारल्याचे बघायला मिळत आहे. नागपुरातील कुंभारांची प्रसिद्ध वस्ती चितारओळीत विघ्नहर्ता गणपतीच्या मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. मात्र, या वर्षी मूर्तींची किंमत तब्बल २० ते ३० टक्क्यांनी वाढलेली आहे.
हेही वाचा - शरद पवारांची दिशाभूल करणाऱ्या भावना गवळींपासून माझ्या जीवाला धोका - हरीश सारडा
सलग दुसऱ्या वर्षी कोरोना महामारीच्या संकट काळात बाप्पाचे आगमन होत आहे. यावर्षी तरी बाप्पाने कोरोनाचा नायनाट करावी, अशी मागणी भक्तांसह मूर्तिकार वर्ग करत आहे. सलग दोन वर्ष कोरोना प्रादुर्भावामुळे लावण्यात आलेल्या निर्बंधानंतर आता हळूहळू बाजारात तेजी परत येत आहे. त्यातच गणेशोत्सव म्हणजे, व्यापाराला नवसंजीवनी देणारा उत्सव असतो. मात्र, तीन दिवसांपूर्वी नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कोरोनाची तिसरी लाट नागपूरच्या वेशीवर असल्याचे वक्तव्य केले होते, त्यामुळे नागरिकांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा थेट परिणाम आज चितारओळीत दिसला. एरवी गणेशोत्सवाच्या काळात गर्दीने फुलणाऱ्या या बाजारात शुकशुकाट बघायला मिळाला.
शाडू मातीच्या मूर्ती महागल्या
पर्यावरणाला नुकसान पोहोचवणाऱ्या पीओपी मूर्तींच्या विक्रीवर निर्बंध लावण्यात आल्याने याचा थेट परिणाम शाडू मातीपासून तयार झालेल्या गणेश मूर्तींवर झालेला आहे. गेल्या वर्षी ३०० रुपयाला विक्री झालेली गणेश मूर्ती यावेळी ७०० रुपयाला विकली जात आहे.
पीओपी मूर्ती विक्रेत्यांवर कारवाई
न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर प्रशासनाने पीओपी मूर्तींच्या विक्रीवर निर्बंध लावले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून नागपूर महानगरपालिकेच्या पथकाकडून पीओपी मूर्ती विक्री करणाऱ्या दुकानांवर धाडी टाकल्या जाता आहेत. त्यामुळे, बाजारात सध्या तरी पीओपीच्या मूर्ती दिसून येत नाहीत.
हेही वाचा - बेळगावमध्ये मराठी माणसाचा विजय तर संजय राऊत यांच्या अहंकाराचा पराभव - फडणवीस