नागपूर - वाहनांच्या हॉर्नमुळे होणारे ध्वनी प्रदूषण कमी करण्याच्या उद्देश्याने केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी एक कल्पना सुचवली आहे. त्यानुसार, रस्त्याने जाताना आता तुम्हाला कर्णकर्कश हॉर्न ऐवजी तबला, पेटी, तानपुऱ्याचे स्वर ऐकू आले तर आश्चर्य वाटू देऊ नका, कारण केंद्रीय वाहतूक मंत्रालय लवकरच या बाबत अध्यादेश काढणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना दिली.
हेही वाचा - झालेल्या विकास कामांची आठवण ठेवा बाकी समझनेवालों को इशारा काफी है - नितीन गडकरी
देशात वायूसह ध्वनी प्रदूषणाचा स्तर दिवसागणिक वाढत आहे. मोठ्या आवाजाच्या हॉर्नमुळे अनेकांना त्रास होतो, तरी देखील अनेक वाहन चालक मोठ्या आवजाचे हॉर्न लावतात, त्यामुळे जणू कानाचे पडदे फाटतील की काय, अशी परिस्थिती सहन करावी लागते. बेजबाबदार वाहन चालक तर विनाकारण जोर जोराने हॉर्न वाजवून इतर वाहन चालकांचे लक्ष विचलित करतात. निष्काळजीपणाने हॉर्न वाजविल्यामुळे वाहन चालक गोंधळून जातात, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता देखील वाढते. ध्वनी प्रदूषण देखील वाढते. यावर तोडगा म्हणून नितीन गडकरी यांनी आपल्या मंत्रालयातील सचिवांना एक अध्यादेश काढण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सप्तसुरांचे सूर येतील कानी -
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेली सूचना प्रत्यक्षात अंमलात आल्यानंतर रस्त्यांवर भारतीय वाद्यांचे सूर कर्कश हॉर्न ऐवजी ऐकू येतील. यामध्ये भारतीय वाद्य तबला, पेटी, तानपुरा, बासरीचे सप्तसूर ऐकू येतील. त्यामुळे, प्रवास करताना आता तुम्हाला गर्दीत कर्णकर्कश आवाज ऐकू न येता सुमधूर संगीत पुढच्या काळात ऐकायला मिळेल.
हेही वाचा - प्रेम संबंधातून महिला भिक्खूची पुरुष भिक्खूने केली हत्या, दोन वेळा केला आत्महत्येचा प्रयत्न