नागपूर - रुग्णसेवा हे ईश्वरी कार्य समजले जाते. कोरोनाच्या जीवघेण्या संकटसमयी देशभरातील डॉक्टरांनी मोठ्या धैर्याने रुग्णांची खूप सेवा केली. कोरोना काळात डॉक्टरांनी केलेले कार्य अतिशय प्रशंसनीय असल्याचे मत केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. ते आज आभासी पद्धतीने नागपूर येथे आयोजित इंडियन असोसिएशन ऑफ प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन आणि इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 49 व्या वार्षिक 3 दिवसीय राष्ट्रीय परिषदेत बोलत होते.
या परिषदेत भाजपचे राज्यसभा खासदार डॉ. विकास महात्मे, परिषदेचे आयोजक डॉ. उदय नारलावार आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे डॉ. अविनाश गावंडे यांच्यासह अनेकजण आभासी पद्धतीने उपस्थित होते.
'बियाँड दी पॅनडेमिक टाईम टू मूव्ह' -
नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला 75 वर्षे पूर्ण होत आहे, त्या निमित्ताने 3 ते 5 मार्च दरम्यान या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असून, या परिषदेचे 'बियाँड दी पॅनडेमिक टाईम टू मूव्ह' हे ब्रीद वाक्य आहे.
देशभरातील 2 हजार डॉक्टर सहभागी -
डॉक्टरांची ही परिषदेत आभासी पद्धतीने आयोजित करण्यात आली असून, या राष्ट्रीय परिषदेला देशभरातील सुमारे 2 हजार डॉक्टर सहभागी झाले आहेत. कोरोनाच्या येणाऱ्या विविध व्हेरिएंटचा सामना कसा करायचा आणि डॉक्टरांची भूमिका कशी राहील यासह वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या बदलांवर चर्चा करण्यात येणार आहे. या परिषदेत जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ, पाथ, सिटीडी, एक्सेस हेल्थ इंटरनॅशनल, आरोग्य मंत्रालयसह विविध नामवंत संस्था सहभागी झालेल्या आहे. या परिषदेत 4 नॅशनल अवॉर्ड, 7 राज्यस्तरीय अवॉर्ड, तसेच उत्कृष्ट प्रबंध सादर करणाऱ्या डॉक्टरांना पुरस्कृत करण्यात येणार आहे.
हेही वाचा - VIDEO : लावण्याला न्याय मिळाल्याशिवाय एबीव्हीपी शांत बसणार नाही - निधी त्रिपाठी