नागपूर - काश्मीर येथे तैनात केंद्रीय राखीव पोलीस दलातील सहायक निरीक्षक नरेश बडोले यांना दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात गुरुवारी वीरमरण आले. आज त्यांच्या पार्थिवावर नागपूर येथे सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या दोन्ही मुलींनी चितेला मुखाग्नी दिला.
केंद्रीय राखीव पोलीस दलाचे सहायक निरीक्षक नरेश बडोले यांचे पार्थिव काश्मीर येथून नागपूरला आणण्यात आले होते. त्यानंतर आज सकाळी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, पोलीस अधिकारी तसेच केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमाराला अंत्ययात्रेला सुरुवात झाली होती. यावेळी संपूर्ण हिंगणा परिसर 'नरेश बडोले, अमर रहे'च्या घोषणांनी निनादला होता.
शहीद नरेश बडोले यांच्या घरापासून सुरू झालेली अंत्ययात्रा डिगडोह स्मशानभूमीत येऊन थांबली. तेव्हा अनेक अधिकाऱ्यांनी नरेश बडोले यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण केले. शहीद जवान बडोले यांच्या दोन्ही मुलींनी वडिलांच्या पार्थिवाला खांदा दिल्यानंतर मुखाग्नी दिला. त्यावेळी उपस्थित जनसमुदायाने शहीद जवान नरेश बडोले अमर रहे, अशा घोषणा दिल्यााने वातावरण कमालीचे भावूक झाले होते.
दरम्यान, कोरोनाच्या संकटातही भारत-पाकिस्तानच्या सीमारेषेवर तणावाची स्थिती आहे.