नागपूर - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात आमचा तपास सुरु आहे. न्यायालयाची परवानगी घेऊन आम्ही तपास करत असल्याचे अनिल देशमुख म्हणाले. अन्वय नाईक यांची केस चुकीच्या पद्धतीनं मागच्या सरकारने दडपल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.
कंगना प्रकरणाशी राज्य सरकारचा संबंध नाही
दरम्यान, कंगना-राऊत प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर अनिल देशमुख यांनी आपली बाजू मांडली आहे. अर्णब प्रकरणात लवकरात लवकर चार्जशीट दाखल करून कारवाई करणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. कंगनाच्या घरावर आणि ऑफिसवर कारवाई बीएमसीने केली होती. त्यांच्याशी राज्य सरकारचा काहीही संबंध नसल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे. त्यामुळे यावर मुख्यमंत्री आणि मी माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे ते म्हणाले.
कोरोना आणि विविध आघाड्यांवर आमच्या सरकारने चांगलं काम केलं, हिच आमची अचिव्हमेंट आहे. आमचे सरकार पाच वर्षे चालेल. विरोधकांनी मुंगेरीलालचे स्वप्न पाहत राहावे, असा टोला लगावला आहे.
गृहमंत्री ऑन सामना मुलाखत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सामनातील मुलाखत प्रतिक्रिया देण्यासारखी नसल्याचे विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. सामनात मुख्यमंत्र्यांनी चांगल्या प्रकारे आपली भुमिका मांडली. विरोधी पक्षाला आपले काम करायचे आहे. कोरोनाबाबत राज्य सरकारने चांगले काम केले. विरोधी पक्षाने कोरोनावर काम करताना सहकार्य करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान यांच्याकडे केली आहे.
हेही वाचा - कार्ड द्या, नाही तर लग्न लावा..! रेशन कार्डच्या मागणीसाठी तरुणाची तहसील कार्यालयावर वाजतगाजत वरात
चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल गृहमंत्री देशमुख यांनी भाष्य केले आहे. पाटील यांची राजकीय उंची काय? काही कर्तुत्व नसताना, उंची नसताना, ते हे बोलतात. त्यांनी आपली उंची काय ते आधी पाहावं. हे सर्वांनाच माहिती आहे. ते मोठ्या मोठ्या नेत्यांबाबत असंच काही बोलून आपली उंची वाढवत राहतात, असे देशमुख म्हणाले.