नागपूर - रेल्वेमध्ये कॉन्स्टेबलच्या 900 पदासाठी जाहिरात निघाल्याची चर्चा सध्या देशभरात सुरू आहे. पण ती जाहिरात फेक ( Fake Add of RPF Constable ) असून यावर कोणीही विश्वास ठेवू नये असे नागपूर मंडळ आयुक्त आशुतोष पांडे यांनी स्पष्ट केले आहे. या संदर्भात अधिकृत माहिती रेल्वेच्या ट्विटर हँडलवर सुद्धा देण्यात आलेली आहे.
केंद्रीय रेल्वे विभागाचे जाहिरात फेक असल्याचे स्पष्टीकरण -
रेल्वेत आरपीएफ पदासाठी फेक जाहिरात तयार करून काही वेबसाईटवर टाकण्यात आली. त्यामुळे रेल्वेच्या आरपीएफ भरतीसाठी प्रतिक्षेत असलेल्या अनेक युवकांनी यात आपली धाव घेत अर्ज करण्यासाठी सुरुवात केली होती. पण या संदर्भात माहिती केंद्रीय रेल्वे विभागाला मिळताच त्यांनी ही जाहिरात फेक असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे या फेक जाहिरातीत कोणीही बळी पडू नये असे आवाहन युवकांना करण्यात आले आहे.
फसवणुकीचा डाव -
यात काही फेक वेबसाईटवर अशा पद्धतीने जाहिरात टाकून फसवणूक करण्याचा हा घोटाळा असू शकतो. कारण रेल्वे भरतीसाठी देशभरातील युवक हे तयारी करत असल्याने लाखोंच्या संख्यने युवक अर्ज करत असतात. त्या परीक्षार्थींना यामध्ये ओढून फसवणुकीचा डाव असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जाहिरातीची पुष्टीसाठी अधिकृत रेल्वेच्या वेबसाईटवर जावे -
रेल्वे भरती जाहिरात निघाल्यास ती इंडियन रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर असेल. त्यामुळे इतर कुठल्याही साईटवर विश्वास ठेवून अर्ज भरू नये तर फक्त आणि फक्त इंडियन रेल्वेचा साईटवर असलेल्या जाहिरातीसाठी अर्ज किंवा पैसे भरावे.
काही जणांची फसवणूक झाल्याची शक्यता -
या जाहिरातीमध्ये रेल्वे सुरक्षा दलात 18 ते 25 वयोगटातील तरुणांना 90 मिनिटाच्या ऑनलाइन परीक्षा असणार आहे. तसेच या स्पर्धेसाठी खुल्या वर्गातील आणि ओबीसी परीक्षार्थी वर्गासाठी 250 रुपये भरायला लावण्याची जाहिरात काही साईटवर पब्लिश करण्यात आली होती. त्यामुळे काही जणांची फसवणूक झाल्याची सुद्धा शक्यता आहे. पण पुढे विद्यार्थ्यांनी भरतीसाठी पैसे भरून आपली फसवणूक होण्यासाठी रोखावी असे आवाहन करण्यात आले होते.