नागपूर - शहराच्या अगदी मध्यभागातून वाहणाऱ्या नाग नदीमध्ये काही मगर असल्याची चर्चा आहे. मगरींचे अस्तित्व सिद्ध करणारे काही व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. नाग नदी नागपूर शहराचे अस्तित्व आणि वैभव म्हणून ओळखली जाते, मात्र पुरातन काळात नाग नदीत मगरींचे वास्तव्य होते अशा कोणत्याही घटनेची नोंद नाही. त्यामुळे, या मगरी नाग नदीत कशा आल्या? या संदर्भात अनेक तर्क वितर्क जोडले जात असून, समाज माध्यमांवरसुद्धा याबाबत खमंग चर्चा सुरू झाली आहे.
नाग नदीत मगरीचा वावर असल्याने रोज दुपारी नागनदीच्या काठावर बघ्यांची गर्दी होत आहे. मगर असल्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. गेल्या 2 महिन्यांपासून कधी धरमपेठ भागात, कधी मोक्षधाम परिसरात मगर दिसून आल्या आहेत, अशी चर्चा आहे. त्यामुळे, या संपूर्ण प्रकारात किती सत्यता आहे, हे तपासण्याचा ईटीव्ही भारतकडून प्रयत्न करण्यात आला. तेव्हा काही रंजक माहिती पुढे आली. ज्यामुळे या चर्चांना बळ मिळाले आहे.
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या नागपूर शहराचे नामकरण नागनदीवरूनच झाले आले आहे. कधीकाळी अतिशय पवित्र समजली जाणारी नागनदी आज प्रदूषणाच्या विळख्यात अडकून अतिशय वाईट अवस्थेत पोहचली आहे. नदीचे रुपांतर आता नाल्यात झाल्याने ही नदी दुर्लक्षित झाली आहे, मात्र नाग नदीत मगरी असल्याची चर्चा सुरू झाल्याने लोकांची गर्दी नाग नदीच्या काठावर गोळा होऊ लागली आहे.
नाग नदीत मगरी आल्या कुठून; शक्यता एक :-
नागपूर शहरात कुठलीही मोठी नदी नाही ज्यातून मगरीसारखा सरपटणारा प्राणी या नदीत येईल. याबाबत तथ्य तपासण्याचा प्रयत्न केला असता दोन गोष्टी प्रामुख्याने समोर आल्या आहेत. ज्यातून मगर नाग नदीत असण्याची शक्यता बळावली आहे. त्यातील पहिली बाब म्हणजे, नागपूरला पाणी पुरवठा मध्यप्रदेशमधून येणाऱ्या पेंच नदीतून होतो. मोठ्या पाईपच्या माध्यमातून हे पाणी शहरात आणले जाते. पेंच नदीत मगर मोठ्या प्रमाणात आढळतात, त्यामुळे या मार्गाने मगर शहरात आल्याची शक्यता नाकारता येत नाही.
दुसरी शक्यता :-
दुसरी शक्यता म्हणजे, नागपूरमधील ऐतिहासिक महाराजबाग प्राणी संग्रहालयात काही वर्षांपूर्वी दोन मगर वर्धा जिल्ह्यातून आणल्या होत्या. पुढे मगरीने 8 ते 10 पिल्लांना जन्म दिला, मात्र २०१९ मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी मागराची छोटी पिल्ले पिंजऱ्यातून पाण्यासोबत वाहत गेली. या घटनेनंतर त्या पिल्लांचा शोध घेतला असता त्यातील 3 पिल्ले मृतावस्थेत आढळली होती, मात्र इतर पिल्लांचा शोध लागला नव्हता, त्यामुळे त्याच मागरीची पिल्ले आता मोठी झाली असल्याची शक्यता आहे. महाराज बागेतील मागरीचा पिंजरा आणि नागनदी यांच्यातील अंतर काही फुटांचे आहे. त्यामुळे, पिंजऱ्यात पाणी वाढल्यावर मगरीचे पिल्लू त्यातून वाहून जाणे हे शक्य आहे.