नागपूर - नागपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या सीताबर्डी बाजाराच्या अगदी शेजारी असलेल्या लोकवस्तीतील एक झाड सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. हे पिंपळाचे झाड ( pipal tree) साधं-सुधं नसून त्याचे वय तब्बल २०८ वर्षे आल्याचा दावा पर्यावरण प्रेमींकडून केला जात आहे. (Fight to save 208 years old pipal tree) नागपूर शहरातील सर्वाधिक वयोमान असलेले झाडं असल्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवली आहे. एका रिकाम्या भूखंडाच्या मध्यभागी असलेल्या झाडाला तोडण्याची जाहिरात नागपूर महानगरपालिकेकडून वर्तमानपत्रात प्रकाशित होताच पर्यावरणप्रेमी या झाडाला वाचण्यासाठी (Fight to save 208 years old pipal tree) पुढे सरसावले आहेत.
स्थानिक नागरिक पिंपळाचे झाड कापायला विरोध करू लागले आहेत. शेकडो पक्षांचे घरटे या झाडावर आहेत. शिवाय शेगावीचे संत गजानन महाराज देखील या ठिकाणी येऊन बसायचे असा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे आता हे झाडं वाचवणे म्हणजे आमच्या आस्थेचा आणि अस्मितेचा प्रश्न निर्माण झाल्याचे स्थानिक सांगत आहेत.
ग्रीन व्हिजील आक्षेप नोंदवणार -
अर्बन ट्री कायदा १९७५ नुसार ५० वर्षांवरील प्रत्येक झाडं हे हेरिटेजच्या श्रेणीत गणले जाते. या झाडाचे वय हे २०८ वर्षे इतके असल्याने त्याला कुणाच्या साक्ष पुराव्याची गरज नाही. महानगरपालिकेने केलेल्या आवाहनानुसार ग्रीन व्हिजील संस्था रीतसर आक्षेप नोंदवणार असल्याची माहिती कौस्तुभ चॅटर्जी यांनी दिली आहे.