नागपूर - विदर्भ माझ्या मनात आहे, विदर्भाचा विकास करून विदर्भाला न्याय देऊ असे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेळोवेळी करतात. मात्र, आजच्या अर्थसंकल्पात विदर्भाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम अर्थमंत्री अजित पवार यांनी केले असल्याची टीका जेष्ठ अर्थतज्ञ श्रीनिवास खांदेवाले यांनी केला आहे. संपूर्ण राज्याचा संतुलित विकास होईल अशी अपेक्षा आजच्या अर्थसंकल्पाकडून होती. मात्र, विदर्भाला भोपळा देत पश्चिम महाराष्ट्राला झुकते माप अर्थमंत्र्यांनी दिल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
राज्याचा अर्थसंकल्प विदर्भाची निराशा करणारा असल्याचे खांदेवाले म्हटले आहेत. कोरोनामुळे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त झाला आहे, त्यामुळे अर्थसंकल्पात महसुली तूट ही विक्रमी १०२२६ कोटींवर गेली आहे, तर राजकोषित तूट ही ६६ हजार कोटींच्या घरात गेली आहे. सरकारने उत्पन्न कमावण्याच्या दृष्टिकोनातून नवीन कोणत्याही उपाय योजना आजच्या अर्थसंकल्पात सुचवलेल्या नसल्याचे ते म्हणाले आहेत. महिलांसाठी मुद्रांक शुल्क एक टक्याने माफ करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे, तर दारूवर करवाढ करणार असल्याचे सांगितले आहे. राज्याचा अर्थसंकल्प म्हंटल तर त्यामध्ये लोक जीवनाचे सर्व भाग, सार्वजनिक आरोग्य, रोजगार, कृषी, कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा विकास, उद्योगांचा विकास, रस्ते यासह अनेक बाबींचा प्रत्येक राज्याच्या अर्थसंकल्पातील नियमित विषय आहेत. शाळांचा विकास करणार, मुलींना मोफत पासेस दिले जातील या घोषणांचे श्रीनिवास खांदेवाले यांनी स्वागत केले आहे
पश्चिम महाराष्ट्राला झुकते माप -
आज अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अजित पवार हे उद्योगिक विकासाच्या संदर्भात फारसे काही बोलले नाही. मात्र, जे काही प्रकल्प त्यांनी सांगितले ते पश्चिम महाराष्ट्रापुरतेच होते, अशी मत जेष्ठ अर्थतज्ञ श्रीनिवास खांदेवाले यांनी व्यक्त केलं आहे. इतर प्रदेशात उद्योगीकरणाचा विकास कसा होईल या बाबत मात्र दिशादर्शक दिसून येत नसल्याचे ते म्हणाले आहेत. गेल्या सरकारने विदर्भ आणि मराठवाडा येथील उद्योगिकरणांचा अभ्यास करून घेतला होता, त्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात घोषणा होईल अशी अपेक्षा होती. मात्र, त्या संदर्भात निराशा झाल्याचे खांदेवाले म्हणाले आहेत.
कृषी विकासाचे काय -
कोरोना काळात ज्या पद्धतीने केंद्राच्या अर्थव्यवस्थेला कृषी क्षेत्राने हातभार लावलेला आहे,त्याच प्रमाणे राज्याची अर्थव्यवस्था सुद्धा कृषी नेच सांभाळलेली आहे. मात्र, आजच्या बजेटमध्ये कृषी विकासाचा आराखडा, कृषी विकास दराच्या संदर्भात अर्थमंत्री काहीही बोलले नसल्याचे खांदेवाले म्हणले.