नागपूर - विधासभा निवडणुकीचा निकाल लागून १५ दिवस लोटलेत. मात्र मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटता सुटत नाहीये. भाजप-शिवसेनेदरम्यान मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू आहे. आघाडीसह शिवसेना सत्ता स्थापन करेल काय, अशीही चर्चा सुरू आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 'तुम्ही पुन्हा येऊ नका...' असे सुचवले आहे.
निवडणुकीआधी 'मी पुन्हा येईन... मी पुन्हा येईन...' असे मुख्यमंत्री फडणवीस प्रचार सभेत म्हणाले होते. त्याचाच संदर्भ घेत 'तुम्ही पुन्हा येऊ नका,' असे फलक लावून घोषणा देत अनोखे आंदोलन राष्ट्रवादीतर्फे करण्यात आले. राज्यात शेतकरी संकटात आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री पदाचा तिढा भाजप-सेनेकडून सुटत नसेल तर शरद पवारांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी मागणी नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.