नागपूर - गेल्या चार दिवसांपासून नागपूर शहरात आणि जिल्ह्यातील सर्वदूर पावसाची संततधार कायम आहे. पावसामुळे जिल्ह्यातील नवेगाव खैरी, नांद, वेना या धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पारशिवनी सावनेर, रामटेक, उमरेड आणि भिवापूर या तालुक्यातील अनेक गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर नागपूरच्या जिल्हाधिकारी आर. विमला यांनी एक ऑडिओ क्लिप जारी करून नागरिकांना काही सूचना करुन सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
गोसेखुर्द प्रकल्पातील बॅकवॉटरमुळे धोका - गोसेखुर्द प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाण्याचा ओढा येत आहे. त्यामुळे प्रकल्पातील बॅकवॉटरमुळेही काही ठिकाणी पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. पाणी पातळी वाढल्याने या परिसरातील नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या परिसरातील गावकऱ्यांनी सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे.
पूर परिस्थितीवर बारकाईने लक्ष - पावसाची संततधार कायम असल्याने अनेक तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासन या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. सर्व यंत्रणा सतर्क करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी आर. विमला यांनी सांगितले आहे.
गरज नसेल तर घराबाहेर पडू नका - नागरिकांनी आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नये व गरजेनुसार सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, पाणी वाहत असताना चुकूनही पुलावरून जाण्याचा प्रयत्न करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आपत्ती व्यवस्थापना संदर्भात कोणतीही माहिती द्यायची असल्यास व मदतीसाठी ०७१२-२५६२६६८ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाकडून १०७७ हा टोल फ्री क्रमांक जारी करण्यात आला असून आपत्कालिन स्थितीत त्याचा वापर करावा, असे आवाहन नागपूरच्या जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे.