नागपूर - महापालिकेत विशेष सभा बोलावण्यात आली होती. या सभेत पाण्याच्या मुद्यावर चर्चा घेण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली. मात्र, बहुमताच्या जोरावर महापौर नंदा जिचकार यांनी विरोधकांची मागणी फेटाळून लावली. त्यामुळे विरोधकांनी गरादोळ केला. परिणामी सभा बरखास्त करावी लागली.
सत्ताधारी विरोधकांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तसेच विरोधक पाण्याचे राजकारण करत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला आहे. या आरोप-प्रत्यारोपाच्या खेळात मात्र जनतेचे प्रश्न जैसेथेच राहिले आहे. उपराजधानी नागपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पेंच प्रकल्पात पाणीसाठाच शिल्लक नाही. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून नागपूर महानगरपालिकेने शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू केला आहे. या निर्णयाविरोधात विरोधकांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्याने या विषयाचे गांभीर्य वाढले आहे. पाण्यावरून गदारोळ माजला असताना मंगळवारी सत्ताधारी पक्षाने महानगरपालिकेत विशेष सभा बोलावली. सभा सुरु होताच विरोधकांनी पाण्याच्या मुद्यावर आवाज बुलंद केला. मात्र बहुमताच्या जोरावर महापौर नंदा जिचकार यांनी विरोधकांची मागणी फेटाळून लावली. परंतू विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते.
कोणताही धोरणात्मक निर्णय घेताना सत्ताधारी विरोधकांना विचारात घेत नसल्याचा आरोप काँग्रेसचे नगरसेवक प्रफ्फुल गुडधे यांनी केला. तर विरोधक पाण्याचे राजकारण करत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला आहे. शहराला ३५० एमएलडी पाण्याची गरज असताना ७०० एमएलडी पाण्याची उचल का केली जाते हा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केलाय. या विषयावर सत्ताधाऱ्यांनी काय काम केले या संदर्भात अॅक्शन टेकन रिपोर्ट सादर करण्याची मागणीही प्रफुल गूढधे पाटील यांनी केली आहे. चर्चा करण्यासाठी आधी प्रस्ताव देणे गरजेचे आहे. पण त्यांना कोणतीही चर्चा करायचे नाही तर केवळ राजकारण करायचे असल्याचा आरोप सत्ता पक्ष नेते संदीप जोशी यांनी केला आहे.