नागपूर : नागपुरात कोरोनाची परिस्थिती दिवसागणिक बिघडत चालली आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने शासकीय रुग्णालयावरील ताणही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यात जिल्ह्यासह परराज्यातूनही रुग्ण उपचार घेण्यासाठी येत आहे. यामुळे रुग्णालयात एकाच बेडवर दोन रूग्णांवर उपचार करण्याची स्थिती निर्माण झाली आहे. आरोग्य व्यवस्थेवरचा वाढता ताण पाहता नागरिकांनी प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे.
शासकीय रुग्णालयालाच नागरिकांचे प्राधान्य
रुगणालयात रुग्ण दाखल होण्याची संख्याही मोठी आहे. खाजगी रुग्णालयात उपचार घेणे सर्वसामान्यांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. यामुळे शासकीय आणि मेयो रुग्णालयात रुग्णांची धाव असते. खाजगी रुग्णालयांचा खर्च पाहता शासकीय रुग्णालयात येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. विदर्भातील जिल्ह्यांसह शेजारील राज्यांतील रुग्णही उपचारासाठी नागपुरात येत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर अतिरिक्त ताण पडत असल्याचे चित्र सध्या निर्माण झाल आहे.
रुग्णांवर उपचार सुरू करण्यास प्राधान्य
रुग्णाची अँटीजेन टेस्ट केल्यानंतर त्याचा अहवाल येण्यास किमान अर्ध्या तासाचा कालावधी लागतो. प्रकृती गंभीर असतांना श्वास घेण्यास त्रास झाल्यास पर्यायी व्यवस्था होईपर्यंत तत्काळ ऑक्सिजन लावून उपचार सुरू करण्यास प्राधान्य दिले जाते. मर्यादीत बेडपेक्षा जास्त रुग्ण आल्यावर काही वेळेस एकाच बेडवर दोन रुग्णांवर उपचार करावे लागतात. रुग्णाला गरजेनुसार प्राथमिक उपचार देऊन नंतर पर्यायी व्यवस्था करण्यावर भर दिला जातो.
बदनामी थांबावा, चांगली सेवा देत आहोत - अधीक्षक
शासकीय रुग्णालयात नागपूरसह इतर जिल्हे तसेच छत्तीसगड, मध्यप्रदेशमधूनही रुग्ण दाखल होत आहेत. अचानकच बरेच रुग्ण आल्याने काही वेळासाठी अशी परिस्थिती निर्माण होते. पण आलेल्या रुग्णाची परिस्थिती गंभीर असल्याने आधी ऑक्सिजन लावून त्यांना उपचार देण्यास प्राधान्य दिले जाते. यामुळे बदनामी थांबविण्याचे आवाहन नागपूर शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी केले आहे.
100 बेड वाढविले
रुग्णलायत सध्या बेड अपुरे पडत आहे. ही परिस्थिती केवळ उपराजधानी नागपूर जिल्ह्यातच नाही तर इतर ठिकाणीही बघायला मिळत आहे. गेल्या वर्षी कोरोनाचा प्रकोप वाढत असताना शासकीय रुग्णालयातील बेड वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र मधल्या काळात ही प्रक्रिया थंड झाली. सध्याची स्थिती पाहता रुग्णालयात आता 100 बेड वाढवण्याची प्रक्रिया राबवण्यात आली आहे. त्यामुळे आता रुग्णालयात 700 कोव्हिड बेड करण्यात आले आहेत.
प्रशासन प्रयत्न करत आहे - पालकमंत्री
पालकमंत्री नितीन राऊत यांना या परिस्थितीविषयी विचारले असता काही चुका झाल्या आहेत. मात्र त्या सुधारण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा - कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या सर्व परीक्षा स्थगित, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय