नागपूर - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपाला मोठी संधी मिळेल. तसेच महाविकास आघाडी सरकारमुळेच भाजपाला सहज विजय मिळवता येईल. त्यामुळे या तीन पक्षाच्या सरकारमध्ये शिवसेना म्हणजे इतरांच्या घरी जन्मलेल्या बाळासाठी पेढे वाटणारे, अशी अवस्था झाली आहे, अशी टीका विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नागपुरात माध्यमांसोबत ते बोलत होते. यावेळी त्यांनी शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या.
स्थानिक स्वराज संस्थेत मर्यादित जागेमुळे भाजपाला यश
राज्यात नुकत्याच विधानपरिषद पदवीधर निवडणुका आटोपल्या आहेत. त्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षाचे लक्ष लागले आहे, ते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीकडे. यात मर्यादित जागा असल्यामुळे आणि तीन पक्षांच्या कारभारामुळे भाजपाला ही निवडणूक सोपी जाणार, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे.
शिवसेनेवर टीका
शिवसेनेबद्दल बोलतांना ते म्हणाले, की शिवसेनेला मागील निवडणुकीत काही मिळाले नाही, तरी ते आनंद साजरे करत फिरत आहेत. हे म्हणजे इतरांच्या घरात जन्मलेल्या मुलासाठी स्वतः पेढे वाटण्यासारखे झाले, अशी टीका करत संजय राऊत यांच्या वक्तव्यांवर प्रत्त्युत्तर दिले आहे. देशात कितीही पक्ष एकत्रित आले, तरी भाजपाला काही फरक पडणार नाही.
'तीन पक्षामुळे भाजपाला संधी'
एखाद्या निवडणुकीत कमी-जास्त होते. परंतु आगामी निवडणुकीत भाजपाला मोठे यश मिळणार आहे. तसेच या तीन पक्षाच्या एकत्रित येण्यामुळे भाजपाला मोठी संधी मिळाली आहे.
शदर पवारांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसावर बोलताना ते म्हणाले, की पवार साहेब महाराष्ट्राची सामाजिक, आर्थिक, राजकीय जडण-घडण समजणारे आहेत. आमचे राजकीय विचार जरी वेगळे असले तरी पवार साहेबांची प्रतिमा ही राजकारणात वेगळी आहे, असे म्हणत फडणवीस यांनी शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.