नागपूर - 'आपल्या पोलिसांवर आपण अविश्वास दाखवला तर चालते आणि इतर कुणी पोलिसांवर बोललं तर, त्यातून महाराष्ट्राचा अपमान होतो. त्यामुळे गृहमंत्र्यांनी मोजून-मापून बोलण्याची गरज असल्याचा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना लगावला आहे. नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांच्या संदर्भात केलेले वक्तव्य अतिशय गंभीर असल्याचे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. महाराष्ट्राच्या इतिहासात याआधी कोणत्याही गृहमंत्र्यांनी आपल्या पोलिसांवर अविश्वास दाखवलेला नाही. पोलीस हे कोणत्याही पक्षाचे नसतात, आम्ही सत्तेत आलो त्या आधीची १५ वर्षं आघाडी सरकारचे राज्य होते, त्यावेळी असलेले पोलीस आमच्या काळातही होते, त्यांना सोबत घेऊन आम्ही चांगले काम केले. सरकार म्हणून सत्ताधारी जे सांगतात, तेच पोलिसांना ऐकावे लागते, त्यामुळे पोलिसांवर गृहमंत्र्यांनीच अविश्वास दाखवणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा - आठवडाभरात एसटी कामगारांचे प्रश्न सोडवले नाही, तर रस्त्यावर उतरु - प्रवीण दरेकर
देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'टेलिफोन ट्यापिंगचा अधिकार गृहमंत्र्यांनी आपल्याकडे घेतल्याचे मला एका वर्तमानपत्रात वाचायला मिळाले, सर्वोच्च न्यायालयाने नियम तयार केले आहेत, यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाची व्यक्ती त्यात हस्तक्षेप करू शकत नाहीत. माझ्याही काळात नाही, त्या आधीच्या काळातही नाही आणि वर्तमानकाळात हे अधिकार मुख्य सचिव, अप्पर मुख्य सचिव यांना देण्यात आले आहेत. हे अधिकार कधीही गृहमंत्री किंवा मुख्यमंत्र्याकडे नव्हते, त्यांचा रिव्ह्यू घेण्याचा अधिकारही राजकारणी व्यक्तींना नसल्याचे ते म्हणाले आहेत. त्यांनी असे केले असेल तर, त्यांना माझा एक सल्ला आहे, त्यांना नको असले तरी राज्याचा विरोधी पक्षनेता म्हणून सांगतो की, हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान आहे'.
हेही वाचा - शेतकऱ्यांप्रती काँग्रेसचे प्रेम बेगडी तर, शिवसेना संभ्रमित, देवेंद्र फडणवीस यांची टीका