नागपूर - वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या नागपुरात लॉकडाऊनच्या काळात सायबर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. हे प्रमाण 25 ते 30 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. या मध्ये सर्वाधिक गुन्हे हे फसवणुकीचे आहेत. लॉकडाऊनच्या काळातच इंटरनेटचा वापर सर्वाधिक झाला आहे. त्यामुळे सायबर क्राइम संदर्भातील सर्वाधिक गुन्हे देखील याच काळात घडल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये, बँकिंग फ्रॉड, अकाऊंट हॅकिंग, नेट बँकिंग तसेच अन्य सायबर गुन्ह्यांचा समावेश आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या महामारीमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन होते. भीतीमुळे लोक बाहेर पडायला धजत नव्हते. तसेच सर्व आर्थिक व्यवहार डिजीटल पद्धतीने करण्याचे आवाहन केले जात होते. याच संधीचा फायदा घेत सायबर क्रिमिनल्सने हात साफ केलाय.
2019 साली नागपूर येथे सायबर क्राइम विभागा अंतर्गत 1502 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. मात्र यावर्षी केवळ दहा महिन्यांत हा आकडा 1800 पर्यंत वाढला आहे. यामध्ये फेसबुक आणि व्हॉट्सअॅपच्या मदतीने गुन्हेगारांनी सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर डल्ला मारला.
महत्वाचे म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत या प्रकारच्या गुन्ह्यांची टक्केवारी यंदा 10 ते 15 टक्क्यांनी वाढली आहे. तर फेक बॅंक कॉलच्या माध्यमातून देखील सायबर गुन्हेगारांनी अनेकांना लुटले आहे. यामध्ये महिलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. या प्रकारातील सुमारे 18 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. महत्वाचं म्हणजे व्हॉट्सअॅप आणि फेसबुक मेसेंजर अॅपमार्फत धमकावणे, लुबाडणे आणि ब्लॅकमेलिंग करण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.
यामुळे नागपूर पोलिसांनी इंटरनेटच्या माध्यमातून समाज माध्यमांवर कायम सक्रिय राहणाऱ्यांसह प्रत्येकाला सतर्कतेचा इशारा दिला आहे. फेसबुक आणि मेल अकाऊंट हॅक होण्याच्या घटना वाढल्या असून त्या बदल्यात हॅकर पैसे मागत आल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. मागील वर्षी 84 टक्के प्रकरणांची चौकशी प्रलंबित होती. मात्र यंदा हे प्रमाण कमी झाल्याचा दावा सायबर क्राइम विभागाचे पोलीस निरीक्षक अशोक बागुल यांनी केला आहे.