नागपूर - आज भारतासाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे. देशातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम सुरू झाला आहे. आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात केल्यानंतर नागपुरातील पाच केंद्रांवर लसीकरण सुरू झाले आहे. नागपूरच्या पचपावली परिसरात असलेल्या महानगरपालिकेच्या स्त्री रुग्णालयात(सुतीका गृह) पहिली लस टोचण्यात आली आहे. त्यापूर्वी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत आणि शहराचे प्रथम नागरिक म्हणजेच महापौर दया शंकर तिवारी यांच्या हस्ते लसीकरण केंद्राचे उदघाटन करण्यात आले.
महानगरपालिका क्षेत्रासाठी २२ हजार लस पोहोचल्या आहेत. यामध्ये नोंदणी झालेल्या २२ हजार ५०० आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी १० हजार कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यात लस देण्यात येणार आहे. मनपातर्फे प्रत्येक केन्द्रावर दररोज १०० आरोग्य सेवकांना लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात डॉक्टर, नर्स, सफाई कामगार, रुग्णालयांचे इतर कर्मचारी, आंगनवाडी कर्मचारी, आशा वर्कर यांना लस देण्यात येत आहे. प्रत्येक केन्द्रावर मनपाचे ४ आरोग्य कर्मचरी व पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. लसीकरण केन्द्रात लस लावण्यापूर्वी कर्मचा-यांच्या नावाची तपासणी केली जाते. त्यानंतर त्यांचे तापमान घेऊन सॅनीटाइज करुन प्रतीक्षागृहात त्यांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. लसीकरण करण्यापूर्वी त्यांची ओळख पटविल्यानंतर कोव्हिड पोर्टलवर त्यांच्या नावाची नोंदणी केली जात आहे. लसीकरण केल्यानंतर त्यांना अर्धातास निरीक्षण कक्षामध्ये थांबल्यानंतरच त्या लाभार्थ्यांना घरी जाऊ दिलं जात आहे.
ऐच्छिक व नि:शुल्क लस
‘कोव्हिन’ ॲपवर नोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचा-यांना लस देण्यात येणार असली तरी ती बंधनकारक करण्यात आलेली नाही. लस ही ऐच्छिक आहे. विशेष म्हणजे लस पूर्णत: नि:शुल्क आहे. या सर्व केंद्रांवरही नि:शुल्क लस देण्यात येणार आहे.
पहिली लस मिळाल्याचा आनंद
आज नागपूरच्या पाच केंद्रांवर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, डागा रुग्णालय, एम्स आणि मनपाचे पाचपावली सुतिकागृह समाविष्ट आहे. लसीकरणाच्या मोहिमेचा शुभारंभ मनपाच्या पाचपावली येथील सुतिकागृह येथून झाला आहे. या ठिकाणी डॉ शुभंकर भिवगडे यांना पहिली लस टोचण्यात आली आहे. लस संदर्भात मनात कुठलीही शंका नाही,उलट, मला पाहिली लस टोचण्यात आली आहे याचा आनंद झाल्याचं त्यांनी सांगितले आहे.