नागपूर - राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात कोरोना रुग्णांची ( Corona Patient Increase In Nagpur ) संख्या धक्कादायकरित्या वाढू लागली आहे. दरदिवशी रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेसह प्रशासनाची चिंता वाढली आहे. एवढेच नाही, तर ओमायक्रॉनबाधित रुग्णसंख्यादेखील (omicron In Nagpur ) हळूहळू वाढत आहे. नवीन वर्षातील सात दिवसांत कोरोना बधितांची रुग्णसंख्या दोन हजारांपेक्षा जास्त झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याची भीती व्यक्त केली जाते आहे. शुक्रवारी झालेल्या एकूण चाचण्या आणि पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या यांचा ताळमेळ जुळवला असताना नागपुरचा पॉझिटिव्हीटी रेट १० ( Nagpur Corona Positivity Rate ) टक्यांच्या जवळ गेल्याचे धक्कादायक आकडे पुढे आले आहेत. धक्कादायक म्हणजे १ जानेवारीला नागपुरात पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट हा केवळ १.३१ टक्के इतकाच होता. मात्र, दहा दिवसांत सरासरी पाच हजार चाचण्या होत असल्याने पॉझिटिव्हीटी रेट मात्र ९.३० टक्के इतका झाला आहे. ही वाढलेली आकडेवारी नागपूरसाठी अत्यंत धोकादायक ठरणारी आहे.
ओमायक्रॉनचे अर्धशतक पूर्ण -
नवीन वर्षाचे आगमन कोरोना विषाणूंच्या वाढत्या प्रादुभावासह झाले आहे. एक जानेवारीपासून रुग्णसंख्या वाढायला सुरुवात झाली होती. ती सातव्या दिवशीदेखील कायम आहे. या सात दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या २ हजारांच्या पुढे गेली आहे. तर ओमायक्रॉन रुग्णसंख्येने अर्धशतक पूर्ण करून शतकाकडे वाटचाल सुरू केली आहे. ज्यावेगाने रुग्णसंख्या आणि पॉझिटिव्हीटी रेट वाढतो आहे, ते बघून सर्वांच्या मनात धडकी भरणारे आहे.
सात दिवसांची रुग्णसंख्या आणि पॉझिटिव्हीटी रेट -
१ जानेवारी रोजी नागपुरात ४११६ चाचण्या झाल्या होत्या. त्यापैकी ५४ कोरोना बधितांची नोंद झाली होती. त्यावेळी पॉझिटिव्हीटी रेट हा १.३१ टक्के होता. २ जानेवारीला ४७४० चाचण्या झाल्या त्यापैकी ९० जणांना कोरोनाची बाधा झाली होती. त्याचा पॉझिटिव्हीटी रेट १.८९ टक्के होता. ३ जानेवारीला कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ नोंदवण्यात आली होती. त्यादिवशी नागपुरात १३३ कोरोनाबाधित आढळून आले. त्यासाठी ४९२७ चाचण्या कराव्या लागल्या होत्या म्हणजेच ३ जानेवारीचा पॉझिटिव्हीटी रेट वाढून २.६९ टक्के झाला. ४ जानेवारीच्या दिवशी ५९६८ चाचण्या घेण्यात आल्या. ज्यामध्ये १९६ जणांना कोरोना झाल्याचे निदान झाले असून त्या दिवशी पॉझिटिव्हीटी रेट हा ३.२८ टक्के झाला. ५ जानेवारी रोजी चाचण्यांची संख्या वाढवून ७०४२ इतकी झाली असताना ४०४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यामुळे त्या दिवशीचा पॉझिटिव्हीटी रेट हा वाढून ५.७३ टक्के इतका झाला. ६ जानेवारीला सुद्धा रुग्ण संख्येसह पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ नोंदवण्यात आली. ६ जानेवारी रोजी संपूर्ण जिल्ह्यात ४४१ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून त्याकरिता ५३५० चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्या दिवशीचा पॉझिटिव्हीटी रेट हा ८.२४ इतका झाला होता. शुक्रवारी म्हणजेच ७ जानेवारी रोजी ७४९९ चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ६९८ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. आजचा पॉझिटिव्हीटी रेट ९.३० टक्के पर्यंत गेला आहे.