नागपूर - गेल्या काही दिवसांपासून उपराजधानी नागपुरात असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात कोरोनाचा उद्रेक झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. मेडिकल आणि डेंटल रुग्णालयातील मिळून काल १५ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली होती, आज तो आकडा ३८वर पोहोचला आहे. त्यामुळे मेडिकल कॉलेजला कोरोनाच्या विळख्यात अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. एवढेच नाही तर निवासी डॉक्टरांसह इतर संक्रमित झाले असल्याची माहिती पुढे आली आहे.
रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने केले भरती
नागपूर मेडिकल कॉलेजमधील कोरोनाबाधितांचा आकडा 38 झाला असून यात डेंटल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या नऊ तर एमबीबीएसच्या १२, पीजी करणारे ९ आणि ३ स्टाफ नर्स अशा एकूण 38 जणांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह आलेल्यांपैकी चार जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे, तर बाकी सगळ्यांवर उपचार सुरू आहेत. यातील बहुतांश रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. मात्र त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना भरती करून घेण्यात आले आहेत. मेडिकलमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने मेडिकल प्रशासनाने संपूर्ण हॉस्टेल सॅनिटाइझ केले आहे. तर ऑफलाइन क्लासेस बंद करून ऑनलाइन क्लासेस सुरू करण्यात आली आहेत. प्रॅक्टिकल्स बंद करण्यात आले आहेत.
मेडिकलवर ताण येण्याची शक्यता
कोविडच्या काळात विदर्भातील एकमेव कोविड डेडिकेटेड रुग्णालय म्हणून मेडिकल काम करत होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा नागपूरमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना आता डॉक्टरच पॉझिटिव्ह होत असल्याने भविष्यात आरोग्य यंत्रणेवर ताण वाढण्याची शक्यता आहे.