नागपूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय पातळीवर अनेक निर्णय घेण्यात येत आहेत. तसेच अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. नागपूर शहरातील लकडगंज पोलीस स्टेशनमध्ये कोरोनाच्या भीतीने संपूर्ण पोलीस ठाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक कर्मचाऱ्याला मास्क घालणे अनिवार्य केले आहे.
हेही वाचा... बापरे...! कोरोनामुळे बंदी असताना एसडीएफ शाळेने घेतली नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सध्या ही परीक्षेची वेळ आहे. त्यांनाही कामावर हजर रहावे लागणार आहे. यामध्ये पहिला क्रमांक लागतो, तो म्हणजे पोलीस विभागाचा. कितीही वाईट परिस्थिती असली तरी समाजाच्या सुरक्षेसाठी पोलीस विभागात काम करणाऱ्या प्रत्येकाला कर्तव्यावर हजर राहणे अनिवार्य असते. सध्या राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आता पोलीस स्टेशनमध्येच अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत.
नागपुरातील लकडगंज पोलीस स्टेशचे निरीक्षक नरेंद्र हिवरे यांनी सामाजिक संस्थांच्या मदतीने संपुर्ण पोलीस स्टेशनचे निर्जंतुकीकरण केले आहे. एवढेच नव्हे तर हिवरे यांनी प्रत्येक कर्मचाऱ्यांना मास्क उपलब्ध करून दिले असून ते घालूनच कामात सहभागी होण्याच्या सूचना केल्या आहेत. राज्यातील सर्वात अत्याधुनिक पोलीस स्टेशन म्हणून लकडगंज पोलीस स्टेशचा उल्लेख केला जातो. आता स्वच्छतेच्या बाबतीतही या पोलीस स्टेशनने सर्वांना मागे टाकत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढाकार घेतला आहे.