नागपूर - शहरातील शासकीय महाविद्यालयात वैद्यकीय सेवेचा बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे मृतदेह असलेले स्ट्रेचर ढकलण्याची जबाबदारी त्यांच्या नातेवाईकांवर ढकलून वैद्यकीय महाविद्यालयाचे कर्मचारी मोकळे झाले आहेत. हा संपूर्ण प्रकार मृताच्या नातेवाईकाने आपल्या मोबाईलमध्ये कैद करून गैरप्रकाराला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने ठरवून दिलेल्या नियमानुसार, कोविडमुळे मृत झालेल्या रुग्णाचा मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना देता येत नाही. शिवाय त्यांनी काही अंतर राखूनच मृतदेहाचे अंत्यदर्शन घ्यावे लागते. मात्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सर्व नियम कायदे कागदावरच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मात्र, नागपूरच्या मेडिकल येथील प्रशासनाने आणि कर्मचाऱ्यांनी कोरोनामुळे दगावलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनाच मृतदेह स्ट्रेचरवरून नेण्यास भाग पाडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. यासंदर्भात एका तरुणाने आपल्या मोबाईलमध्ये सर्व प्रकार कैद केला आहे. तसेच कोविड वॉर्ड असो की शवविच्छेदन गृह कुठेही सुरक्षेच्यादृष्टीने उपाययोजना केल्या जात नसल्याचा गंभीर आरोप त्या तरुणानी केला आहे.
काही दिवसांपूर्वीच कोरोना विषाणूसोबत लढणारा जीवंत रुग्ण दगावल्याचे त्याच्या नातेवाईकांना सांगितले होते. तसेच आता हा प्रकार घडल्यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे.