नागपूर - गटनेत्यांना विश्वासात न घेता आयुक्तांच्या विरोधात स्थगन प्रस्ताव दिल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली आहे. थोरात यांच्या सूचनेवरून नगरसेवक नितीन साठवणे यांना काँग्रेस पक्षाने नोटीस बजावली आहे. यावर साठवणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात स्थगन प्रस्ताव टाकल्याने काँग्रेस नगरसेवक नितीन साठवणे यांना पक्षाने नोटीस बजावली आहे. तीन महिन्यानंतर पार पडत असलेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत काँग्रेस नगरसेवक नितीन साठवणे यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरुद्ध स्थगन प्रस्ताव दाखल केला आहे. कोरोना परिस्थिती हाताळताना शासकीय कामात अडथळा केल्याचा आरोप करत नगरसेवक साठवणे यांच्यावर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याविरुद्ध साठवणे यांनी स्थगन प्रस्ताव दाखल केला आहे. स्थगन प्रस्ताव मागे घेण्याचे पक्षाने सुचवले होते. परंतु मागे घेण्यात आला नाही. त्यामुळे साठवणे यांनी दाखल केलेला स्थगन प्रस्ताव ही पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचे सांगत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेवरून साठवणे यांना काँग्रेसने नोटीस बजावली आहे. मुंढे यांच्यावरून काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे चित्र असून पक्षश्रेष्ठी काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.
यापूर्वी शिवसेनेच्या मंगला गवरे यांनीही आयुक्तांविरुद्ध दाखल केलेला स्थगन प्रस्ताव मागे घेतला होता हे विशेष. पक्षाकडून नोटीस मिळाल्यानंतर साठवणे यांनी नाराजी व्यक्त करत नगरसेवकांनी जनतेची कामे कशी करावी असा प्रश्न काँग्रेस पक्षश्रेष्ठींना विचारला आहे.