नागपूर - केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या किंमती भरमसाठ वाढवल्या आहेत. पेट्रोलने शंभरी पार केली आहे. तसेच, डिझेल ९२ रुपये लिटर झाले आहे. ही भाववाढ अशीच चालू राहिली तर डिझेलचे दरही लवकरच शंभरी पार करणार. या दरवाढीच्या विरोधात नागपुरातही वर्धमान नगर चौकातील पेट्रोल पंपावर काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन काँग्रेसचे महाराष्ट्र सचिव उमाकांत अग्निहोत्री यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
हेही वाचा - महाराष्ट्रात अनलॉक प्रक्रियेला सुरुवात; उपराजधानीत मेट्रो सुविधा दर अर्धा तासांनी प्रवाशांच्या सेवेत पूर्ववत
आधीच कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटातून जात आहे. अशात पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीने नागरिकांना महागाईचा मार सहन करावा लागत आहे. या दरवाढ विरोधात आज राज्यभर काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात येत आहे. यात नागपुरातील वर्धमान नगर पेट्रोल पंप चौकात काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी हातात फलक घेऊन दरवाढीला विरोध केला.
स्वयंपाकाचा गॅसही ९०० रुपये झाला आहे. या विरोधात राज्यभर एकाचवेळी एक हजार ठिकाणी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान तीन पेट्रोल पंपांवर आंदोलन करून मोदी सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.
हेही वाचा - ग्रामविकासाचा पाया शिवछत्रपतींनी घातला - पालकमंत्री डॉ. नितीन राऊत