नागपूर : महानगरपालिकेचे महापौर संदीप जोशी यांनी पुन्हा एकदा महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांवर आरोपांची सरबत्ती केली आहे. कायद्याने चालणार असे सांगणाऱ्या मुंढेंनी स्वतः कायदा आणि नियम पायदळी तुडवत बेकायदेशीरपणे आणि असंवैधानिकपणे स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे हाती घेतल्याच्या आरोपांचा पुनरुच्चार जोशी यांनी केला. त्या करिता त्यांनी १० जुलै रोजी स्मार्ट सिटी प्रोजेक्टची होऊ घातलेल्या बैठकीचा अजेंडा समोर ठेवला आहे. ज्यामध्ये संचालक म्हणून ठेवण्याचा मुद्दाही चर्चेत येणार असल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा - पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सीडीएस प्रमुख बिपीन रावत लडाखमध्ये दाखल
'तुकाराम मुंढे तुम्ही तर शिस्तप्रिय, नियमाने चालणारे अधिकारी आहात, मग नागपूर स्मार्ट अॅन्ड सस्टनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये साधे संचालकही नसताना आपण सरकारचा 18 कोटी 82 लाखांचा निधी एका खाजगी कंत्राटदाराला कसा काय दिला' असा सवाल नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी विचारला आहे.
तुकाराम मुंढे नागपूर स्मार्ट अॅन्ड सस्टनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये संचालक असल्याचा त्याचा सीईओ असल्याचा असा दावा करत होते. त्याच आधारावर तुकाराम मुंढे यांनी 6 मे 2020 रोजी एका खासगी कंत्राटदाराला 18 कोटी 82 लाखांचा निधी दिला असल्याचे जोशी यांनी म्हटले आहे.नागपूर स्मार्ट अॅन्ड सस्टनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या संचालक मंडळाच्या 10 जुलै रोजी होऊ घातलेल्या बैठकीचा अजेंडा ही समोर आला आहे. त्यात तुकाराम मुंढे यांना संचालक मंडळात एक संचालक म्हणून ठेवण्याचा मुद्दा ही चर्चेत येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
याच अजेंड्याचा आधार घेत महापौर संदीप जोशी यांनी तुकाराम मुंढे आतापर्यंत खोटे बोलत असल्याचा आरोप केला आहे. जेव्हा 10 जुलैच्या बैठकीत मुंढे यांना संचालक पदी घेण्याचा विषय चर्चेला येणार आहे. तेव्हा मुंढे यांनी 6 मे रोजी सरकारचे 18 कोटी 82 लाख रुपये एका खासगी कंत्राटदाराच्या घशात कोणत्या नियमाने घातले, असा सवाल महापौर संदीप जोशी यांनी विचारला आहे. नियमाने वागणार तुकाराम मुंढे चुकले आणि त्यांनी सरकारी पैसे खासगी कंत्राटदाराला दिले, हेच यातून सिद्ध होत असल्याचा आरोप महापौरांनी केला आहे.