नागपूर - एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सरकारच्या मंत्र्यांना वेळ नाही, मात्र 100 कोटींचा भ्रष्टाचार करण्यासाठी वेळ आहे, असा आरोप राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. त्यांनी आज नागपुरातील गणेशपेठ बसस्थानकाला भेट दिली. यावेळी सरकारने आंदोलन चिघळवू नये, चर्चा करून तोडगा काढावा, अन्यथा भाजप स्वतः या मंडपात बसून आंदोलन करणार, असेही म्हटले.
हेही वाचा - नवाब मालिकांनी आरोप केलेले मुन्ना यादव कोण आहे?
एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. प्रवाशांची खासगी वाहतूकदारांकडून मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. पण, सरकारच्या पालकमंत्र्यांनी पाच दिवस लोटले असताना देखील आंदोलकांची भेट घेतली नाही. पालकमंत्री यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे. मात्र, कर्मचाऱ्यांचे निलंबन केले जात आहे, असे बावनकुळे म्हणाले.
मंत्री खंडणी वसुलीच्या कामात व्यस्त असल्याचा गंभीर आरोप
एसटी कर्मचाऱ्यांच्या यापूर्वी अनेक बैठका झाल्या आहेत व त्या विफल ठरल्या आहेत. मार्ग सुटत नसल्याने आंदोलनाची भूमिका घेण्यात आली आहे. दिवाळीच्या सणात त्यांना बोनस मिळावा, विलिनीकरण करण्याची मागणी आहे. मागण्या मान्य करून तोडगा काढा, त्यांचा अंत पाहू नका. एसटी कर्मचाऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्या सरकारवर सदोष मन्युष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, असेही बावनकुळे म्हणालेत. हे आंदोलन चिघळले तर भाजप रस्त्यावर उतरणार, असा इशाराही त्यांनी दिला. हे सरकार अत्याचारी, दुराचारी, भ्रष्टाचारी आहे. या सरकारचे मंत्री रेती माफिया, खंडणी या कामात व्यस्त असल्याचा गंभीर आरोप देखील बावनकुळे यांनी केला.
मुनगंटीवार यांच्या व्हायरल व्हिडिओवर बावनकुळे म्हणाले..
एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य होऊ शकत नसल्या तरी काही मागण्या सरकार मान्य करू शकतात, पण आंदोलन चिघळणे, त्यांच्यावर कारवाई करणे, ही मोघलशाही सुरू आहे. 8 ते 9 हजार रुपयांत काय करणार. या सरकारला कर्मचाऱ्यांचे हित जोसपता येत नसेल तर, हे सरकार काहीही कामाचे नाही, असेही चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणाले.
हेही वाचा - नवाब मालिकांचा हायड्रोजन बॉम्ब फुसकाच, मलिकांविरुद्ध एक रुपयाचा मानहानीचा दावा ठोकणार - मुन्ना यादव