गोंदिया - डिसेंबर महिन्यात नागपूर पदवीधर मतदार संघाच्या असलेल्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. पदवीधर मतदार संघ निवडणुकीत नागपूर विभागातून मागील ५० वर्षांपासून भाजपचा उमेदवार विजयी होत आहे. त्यामुळे या वर्षी सुद्धा भाजपचा विजयी होणार असल्याचा विश्वास भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, की भाजपचे संदीप जोशी यांनी काल नामांकन पत्र दाखल केले आहे. त्यांचा मोठ्या मताने विजय होईल, असा विश्वास आहे.
मग मुंबईत कोरोना नाही का?
बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, की या सरकारने उपराजधानीचा अपमान केला आहे. या वर्षी हिवाळी अधिवेशन नागपुरात न घेता मुंबईत घेण्यात येत आहे. या सरकारने उपराजधानीवर अन्याय केला आहे. एकीकडे कोरोनाचे कारण देतात. नागपूरमध्ये कोरोना आहे. मग मुंबईत कोरोना नाही का? सरकारने नागपूर कराराचे उल्लंघन केले. या सरकारचा निषेध करतो, असे बावनकुळे यांनी म्हटले.
महाविकास आघाडी सरकारकडून विदर्भावर अन्याय-
पुढे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, की या सरकारने या ११ महिन्यात विदर्भातील एकही प्रश्न सोडविला नाही. शेतकऱ्याला काहीही अनुदान दिले नाही. विदर्भ वैधानिक मंडळ बंद पाडले. रस्त्याचे काम बंद पाडले. सर्व सरकारी योजना बंद पडल्या आहेत. या सरकारला नागपूर येथे अधिवेशन घेण्यासाठी भीती वाटत आहे. तसेच या सरकारने नेहमीच विदर्भावर अन्याय केल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला. आम्ही अन्याय खपवून घेणार नाही, असेही बावनकुळे यांनी इशारा दिला.
दरम्यान, काँग्रेसकडून अभिजित वंजारी हे पदवीधर मतदार संघाची निवडणूक लढवित आहेत.