नागपूर- शहरातील काँग्रेस नगरसेवक बंटी शेळकेंविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे एक शिष्टमंडळ विभागीय आयुक्त कार्यालयात गेले होते. त्यावेळी काँग्रेस नगरसेवक बंटी शेळके यांनी खासगी रुग्णालयात सुरू असलेल्या लूटी संदर्भात अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा संतापलेल्या बंटी शेळके यांनी नाना पाटोलेंच्या समोरच अधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून लकडगंड पोलिसांनी बंटी यांना नोटीस बजावली आहे.
नागपुरात नगरसेवक बंटी शेळके यांनी विभागीय आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांसंदर्भात अपशब्द वापरत त्यांना जाळून टाकण्याची धमकी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. विभागीय आयुक्तांच्या दालनाबाहेर हा प्रकार घडला होता. व्हिडिओमध्ये काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांनी खासगी रुग्णालयात गरीब रुग्णांची लूट सुरू असल्याच्या मुद्यावर संताप व्यक्त करताना अपशब्दांचा प्रयोग केला होता. या प्रकरणी विभागीय आयुक्त कार्यालयातील पोलीस कर्मचाऱ्यांनी सदर पोलीस ठाण्यात बंटी शेळकेंविरुद्ध तक्रार दिली, त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय होती बंटी शेळके यांची तक्रार-
नागपुरात कोरोना रुग्णांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. गरीब रुग्णांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन खासगी रुग्णालयांनी अक्षरशः लूट सुरू केली असल्याने गरजू रुग्णांना उपचार मिळणे शक्य होत नाही. अशा रुग्णांचे ऑडिट करण्यासाठी नेमणूक करण्यात आलेलले अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत, अशी तक्रार घेऊन काँग्रेस नगरसेवक बंटी विभागीय आयुक्त कार्यालयात गेले होते, त्यावेळी अचानक त्यांचा स्वतःवरून ताबा सुटला होता.