नागपूर - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्त्यव्यावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष भविष्यात एकत्र येतील, ही शक्यता आज राजकीय जाणकारांना धूसर वाटत आहे. मात्र, विश्व हिंदू परिषदेचे आंतराष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी भाजप-शिवसेनेतील मतभेद कोणत्याही क्षणी दूर होऊ शकतात, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले प्रविण तोगडीया -
राजकारणात अशा घटना घडत असतात. आज दिसत असलेले मतभेद विसरून उद्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे नेते गळाभेट घेतील आणि एका पंगतीत जेवायला सुद्धा बसतील. राजकारणात कधी काय घडेल, हे सांगता येत नाही. प्रवीण तोगडिया यांनी अफगाणिस्तान आणि तालिबान मुद्यावरदेखील आपले स्पष्ट मत मांडले आहे. ते म्हणाले की कोणत्याही परिस्थितीत भारताने अफगाणिस्तान मुसलमानांना आपल्या देशात शरण देता कामा नये, त्याचे गंभीर परिणाम पुढ्या पिढ्यांना भोगावे लागतील, असेही ते म्हणाले. अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर तालिबानी आतंकवाद्यांनी हल्ला केल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानमधील तालिबानी शासन संपवले. ठीक २० वर्षानंतर तालिबानने पुन्हा अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला आहे. भारतातदेखील तालिबानी विचार केंद्र आहेत. ज्यांच्यापासून भारताला सर्वाधिक धोका असल्याचे ते म्हणाले. भारतात दारूल, देवबंद आणि तब्लिकी जमातचे हेडक्वाटर दिल्लीमध्ये आहेत, याचे जगातील ६७ देशांमध्ये विचार केंद्र आहेत. त्यामुळे भारताला दहशतवादी संघटनांचा धोका आहे. त्यामुळे भारत सरकारने तत्काळ कारवाई करत या धोक्याचा बंदोबस्त करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
'तालिबान हे व्यक्ती नसून विचार आहे' -
सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तालिबान हा व्यक्ती नसून एक विचार आहे. हा विचार भारतासोबतच जगासाठी धोकादायक असल्याचे मत प्रवीण तोगडिया यांनी व्यक्त केले. या घातक विचाराचे केंद्र आपल्या देशात सुद्धा असल्यामुळे केंद्र सरकारने तत्काळ तब्लिकी, दारूल देवबंद आणि जमात-ए-उलेमा या संघटनांवर प्रतिबंध लावावे. तबलिकी म्हणजे मोठ्या भावाचा कुर्ता आणि लहान भावाची पैजामा असून तब्लिकी जमात ही मदरसाची पैदाइस आहे, असेही ते म्हणाले.
'राम मंदिर निर्माणाचे तीनचं नायक' -
अयोध्येत निर्माण होत असलेल्या राम मंदिराच्या संदर्भात बोलताना प्रवीण तोगडिया म्हणाले की, राम मंदिर निर्माणाचे खरे नायक केवळ तीनच व्यक्ती आहेत. अशोक सिंघल, बाळासाहेब ठाकरे आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग यांच्या नावाचा त्यांनी उल्लेख केला.
विरोधकांना आवाहन -
महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य मूल्य मिळावे, या सारख्या विषयांवर विरोधकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी व्यक्त केले. सर्व विरोधकांनी एकत्र येऊन आवाज बुलंद करायला हवा, जे चांगले काम करतील आम्ही त्यांचा जयजयकार करायला मागे हटणार नाही, कारण मी आता कोणत्याही पक्षाचा गुलाम राहिलेलो नसल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा - जुने व्हायरस पुन्हा आलेत, त्यांचा बंदोबस्त करावा लागेल - उद्धव ठाकरे