नागपूर - ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आल्याने भाजप राज्यभर आंदोलन करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्य सरकारमध्ये ओबीसी नेते असल्याची शेखी मिरवणारे छगन भुजबळ, नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार हे प्रसिद्ध हिंदी चित्रपट हेराफेरीतील पात्र असल्याची टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे. ते आज नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आणल्याने भाजपनेसुद्धा आंदोलनाची घोषणा केली आहे. विदर्भासाठी हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले हे विदर्भाचे प्रतिनिधित्व करत असताना देखील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण ते टिकाऊ का शकले नाही? असा प्रश्न शेलारांनी उपस्थित केला आहे. केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आल्याने समाजात अतिशय संतप्त भावना आहेत. न्यायालयात प्रकरण सुरू असताना केवळ राज्य सरकारच्या वेळ काढूपणामुळे मोठा फटका समाजाला बसला असल्याचं ते म्हणाले आहेत. नाना पटोले, छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार हे स्वतःला ओबीसी समाजाचे अंग असल्याचं सांगतात. मात्र, सरकारमध्ये वेगळा वेगळा रंग या तीन नेत्यांनी दाखवला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींना राजकीय आरक्षण दिलं होतं. पण, राजकीय आरक्षणापासून वंचित ठेवण्याचं पाप केल्याचा आरोप शेलार यांनी केला आहे.
ओबीसी आरक्षणा विरोधात याचिका करणारे कोण:-
ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाविरोधात याचिका करणारे विकास गवळी आणि रमेश डोंगरे हे कोण आहेत? असा प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. यापैकी विकास गवळी हे वाशीम येथील माजी आमदारांचे चिरंजीव असून ते नाना पटोले यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप त्यांनी केला. स्वतःच पिटीशन टाकायच्या आणि नंतर केंद्राकडे बोट दाखवण्याचे काम सुरू करायचे हा खेळ बऱ्याच दिवसांपासून सुरू असल्याचं देखील ते म्हणाले आहेत.
मागासवर्गीय आयोग हे पहिले पाऊल आहे. या करिता १४ ते १५ महिने उशीर का झाला? या काळात सरकारने न्यायालयात उत्तर देण्यासाठी वेळकाढू धोरण का स्वीकारले? विकास गवळी आणि रमेश डोंगरे यांचा काँग्रेससोबत काय संबंध आहे? जे काम गुजरात आणि कर्नाटकला जमलं, फडणवीस यांना जमलं ते राज्य सरकारला का जमलं नाही? या प्रश्नांचे उत्तर शेलार यांनी सरकारकडे मागितले आहेत.