नागपूर - आपल्याच पक्षाच्या मंत्र्यावर कारवाई करण्याच्या लेटर बॉम्बने राजकीय वर्तुळात गोंधळ उडवला आहे. काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार आशिष देशमुख यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले. या पत्रातून त्यानी काँग्रेसचे नेते व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांना बडतर्फ करा, असे लिहत घरचा अहेर दिला आहे.
हेही वाचा - नागपुरात महामेट्रोच्या फ्रिडम पार्कचे उदघाटन; मुख्यमंत्र्यांनी गडकरींचे केले कौतुक
राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार हे 2002 मध्ये नागपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना त्यांच्यावर 150 कोटी रुपये खासगी दलालांमार्फत रोख स्वरुपात गुंतवणूक करत 150 कोटी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सुनील केदार यांच्यासह अन्य 10 जणांविरुद्ध महाराष्ट्र राज्य सहकार खात्याकडून न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात 19 वर्षांपासून खटला सुरू असून हे प्रकरण निकालाच्या अंतिम टप्प्यात असताना ते रेंगाळत राहण्यासाठी वकील बदलवण्यात आले असल्याचेही आशिष देशमुख यांनी पत्रात म्हटले आहे.
सरकारी वकील म्हणून काँग्रेसच्या लीगल सेलच्या अध्यक्षाची नियुक्ती
या प्रकरणात सरकारी वकील अॅडव्होकेट ज्योती वजानी असताना त्याना राजीनामा द्यायला लावून त्यांच्या जागेवर अॅडव्होकेट असिफ कुरेशी यांची नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे, अॅडव्होकेट आसिफ कुरेशी हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस लीगल सेलचे अध्यक्ष आहे. यामुळे अशा पद्धतीची नियुक्ती करणे म्हणजे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टचा भंग ठरत असल्याने त्यांची नियुक्ती रद्द होणेही आवश्यक असल्याची गरज बोलून दाखवत त्यांच्या जागेवर सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी आशिष देशमुख यांनी केली.
नागपूर जिल्हा बँकेसह वर्धा आणि उस्मानाबाद बँकेचेही पैसे बुडवले
सुनील केदार यांनी वर्धा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शरद देशमुख यांना सुद्धा 30 कोटी गुंतवण्यास भाग पाडले. यासोबतच उस्मानाबाद जिल्हा बँकेचे तत्कालीन अध्यक्ष कै. पवन राजे निंबाळकर यांनाही दबाव टाकून 30 कोटी अशा पद्धतीने 210 कोटी रुपयांची ठेवी बुडाली. यामुळे तिन्ही बँका शेवटच्या घटका मोजत आहेत. तसेच, अन्य काही गुंतवणूक केल्या असून त्या सुद्धा डुबीत आहे.
गुन्हेगार आणि चारित्र्यहीन मंत्री असल्याचा पत्रात उल्लेख
पत्रात पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचा पूर्व इतिहास गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून चारित्र्यहीन व्यक्ती महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात असणे लांच्छनास्पद बाब आहे. बँक बुडवणारा मंत्री हा राज्यात मंत्री आहे, हे दुर्दैव असल्याचे देशमुख म्हणाले. यामुळे सुनील केदार यांना बरखास्त करावे, अशी मागणी माजी आमदार आशिष देशमुख यांनी पत्राद्वारे उद्धव ठाकरे यांना केली आहे.
हेही वाचा - कुठल्याही अडचणीत सरकार जनतेच्या पाठीशी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे