नागपूर: नागपूर शहरातील वाढती गुन्हेगारी कायमच पोलीस विभागासाठी डोकेदुखी ठरत आहे. दिवसागणिक वाढत असलेल्या गुन्हेगारी घटना नियंत्रणात आणायच्या असतील तर सर्वप्रथम निर्ढावलेल्या गुन्हेगारांना वठणीवर आणणे गरजेचे आहे. अशी टीका कायम होत आली आहे. मात्र,या कर्तव्यात नागपूर पोलीस कमी पडत असल्यानेच नागपूरला राज्यातले क्राईम कॅपिटल म्हणून ओळख मिळाली आहे. नागपूरने वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे गुन्हे क्षेत्रात राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. आणि गेल्या अनेक वर्षांपासून हे स्थान कायम ठेवले आहे.
बालगुन्हेगारीत वाढ नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) ने जारी केलेल्या आकडेवारी नुसार गेल्यावर्षी २०२१ मध्ये नागपुरात बालगुन्हेगारीची ३५१ प्रकरणे समोर आली. २०२० या वर्षाच्या तुलनेत या प्रकारणांमध्ये ७७ घटनांची वाढ झाली आहे. तर २०१९ मध्ये हा आकडा ३८९ इतका होता. राज्यात नागपूरनंतर मुंबई ३३२ आणि पुण्यात २८८ प्रकरणांची नोंद झाली. २ हजार ६१८ प्रकरणांसह संपूर्ण देशात दिल्ली सर्वात पुढे आहे.
महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या महिलांसाठी मध्यभारतातील सर्वात सुरक्षित शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या नागपुराने गेल्या काही वर्षात ही ओळख पुसली आहे. २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली असून महिला विरोधातील गुन्ह्यांची संख्या ११५६ झाली आहे. यामध्ये लग्नाचे आमिष दाखवून, प्रेम संबंधातून होणाऱ्या अत्याचाऱ्याच्या घटना सर्वाधिक आहे.
८ महिन्यात ४५ मर्डर १ जानेवारी ते ३० ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत नागपूर शहरात एकूण ४५ हत्येच्या घटना घडल्या. दर महिन्यात सरासरी पाच ते सहा हत्येच्या घटना घडत आहेत. त्यातही नागपूरच्या इतिहासात पहिल्यांदाच फेब्रुवारी महिन्यात एकही हत्येची घटना घडली नाही. मात्र, त्यानंतर सातत्याने हत्येच्या घटना घडत आहेत.