नागपूर - वाढीव वीज बिलाच्या मुद्यावरून नागपुरात भाजपा युवा मोर्चाच्या वतीने 'नगारा आंदोलन' करण्यात आले. शहरातील व्हेरायटी चौकात हे आंदोलन करण्यात आले. भाजपाकडून वाढीव वीज बिलाबाबत संपूर्ण शहरात आतापर्यंत ६-७ आंदोलने झाली. मात्र, सरकारने याची कोणतीही दखल न घेतल्यामुळे हे आंदोलन करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. झोपी गेलेल्या सरकारला जाग यावी, असे यावेळी आंदोलकांनी म्हटले. मात्र, आंदोलनादरम्यान फिजिकल डिस्टन्सिंगचे तिन-तेरा झाल्याचे पाहायला मिळाले.
वाढीव वीज बिलाच्या मुद्यावरून भाजपा अधिकच आक्रमक होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्ष शिवाणी दाणी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडी सरकार हे फसवे सरकार असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. वाढीव वीज बिलावरून भाजपाकडून आतापर्यंत ६-७ आंदोलने करूनही सरकारने या आंदोलनांची दखल न घेतल्यामुळे झोपी गेलेल्या या नाकारत्या सरकारला जाग यावी, यासाठी हे नगारा आंदोलन करत असल्याचे शिवाणी दाणी यांनी सांगितले. त्याचबरोबर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ३०० युनिटपर्यंत वीज बिल माफ करावे आणि सर्वसामान्यांची पिळवणूक थांबवावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
हेही वाचा - महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी होतोय - शरद पवार
सरकारकडून या नगारा आंदोलनाची दखल न घेतल्याचे परिणाम लवकरच कळतील, असेही शिवाणी दाणी यांनी सांगितले. आंदोलनादरम्यान नगारा वाजवत ऊर्जामंत्री मुर्दाबाद, महाविकास आघाडी मुर्दाबाद च्या घोषणा देत जोरदार निदर्शने करण्यात आली. परंतु, या आंदोलना दरम्यान फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडल्याचे पाहायला मिळाले. कार्यकर्त्यांनी फिजकल डिस्टन्सिंगचे सर्व नियम धाब्यावर बसवत सरकार विरोधात घोषणाबाजी केली.
ऊर्जामंत्री जागे व्हा, असे पोस्टर यावेळी झळकवण्यात आले. मात्र, या आंदोलनाला पोलिसांनी कोणतीही परवानगी दिली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यामुळे या आंदोलकांवर गुन्हे दाखल करणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.