नागपूर - नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील क्रिस्टल हॉस्पिटलमध्ये दाखल कोरोनाबाधित रुग्ण दिलीप कडेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे दिलीप कडेकर यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत १३ मे रोजी माजी महापौर संदीप जोशी यांनी मृताच्या मुलासह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र या प्रकरणात पाचपावली पोलीसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याने आज पुन्हा संदीप जोशी यांच्या नेतृत्वाखाली पाचपावली पोलीस ठाण्याच्या समोर आंदोलन करण्यात आले.
नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी यांच्या नेतृत्वात पाचपावली पोलीस स्टेशन समोर झालेल्या धरणे आंदोलनात कडेकर कुटुंबीय ही सहभागी झाले होते. रुग्णालय प्रशासनाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी केल्याच्या अनेक दिवसानंतरही पोलीस गुन्हा नोंदवायला तयार नाहीत असा आरोप या आंदोलना दरम्यान करण्यात आला. लेखी तक्रार दिल्याच्या १८ दिवसानंतरही पोलीस तपासाच्या नावावर एक पाऊलही पुढे टाकत नसतील तर आमच्यासमोर आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही, असे संदीप जोशी म्हणाले.
माजी महापौर संदीप जोशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन आंदोलकांचा पोलीस ठाण्यात शिरण्याचा प्रयत्न - मृत दिलीप कडेकर यांच्या पत्नी कल्पना कडेकर यांनी न्यायाची मागणी केली. या वेळी पोलीस स्टेशनमध्ये शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. खासगी रुग्णालय सामान्यांच्या जीवावर उठले असताना पोलिसांनी सामान्य नागरिकांची साथ देत नाही, असा मुद्दा समोर करत आंदोलकांनी त्यांचे आंदोलन सुरूच ठेवले. अखेरीस पोलिसांनी माजी महापौर संदीप जोशी यांना ताब्यात घेतले.
प्रकरणाची पार्श्वभूमी काय होती -
२१ एप्रिल रोजी दिलीप कडेकर नामक कोरोना बाधित रुग्णाला क्रिस्टल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रुग्ण ऍडमिट करताना रुग्णालय प्रशासनाने दोन लाख रुपयांच्या पॅकेज मध्ये रुग्ण डिस्चार्ज होईपर्यंत सर्व सोय उपलब्ध केली जाईल, असे आश्वासन रुग्णालय प्रशासनाने दिले असल्याची माहिती मृताचा मुलगा प्रणित याने दिले होते. त्यानुसार प्रणितने उपचारादरम्यान २ लाख रुपये रुग्णालयात जमा केले. त्यानंतर सुद्धा रुग्णालयाने अव्वाच्या सव्वा दराने औषध, टेस्ट आणि उपचाराचे बिल आकारल्याने प्रणित याने माजी महापौर संदीप जोशी यांच्याकडे या संदर्भात तक्रार केली होती. संदीप जोशी यांनी देखील तक्रार मिळाल्यानंतर रुग्णालयात जाऊन बिलांची तपासणी केली असता त्यांना त्यामध्ये प्रचंड घोटाळा आढळून आला. तेव्हा जोशी यांनी बिलांचे ऑडिट करण्याची मागणी रुग्णालय प्रशासनाकडे केली असता रुग्णालय प्रशासनाने ऑडिट करिता काही वेळ मागून घेतला होता. दरम्यानच्या 12 मे रोजी दिलीप कडेकर यांचे कोरोनाच्या उपचारा दरम्यान क्रिस्टल रुग्णालयात मृत्यू झाला होता. रुग्णालयाने दिलीप कडेकर यांच्या उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आणि अवास्तव बिल आकारल्याचा आणि बिलाच्या रकमेसाठी त्रास दिल्याचा आरोप करत कडेकर कुटुंबियांनी क्रिस्टल रुग्णालया विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंदवावा अशी तक्रार पाचपावली पोलीस स्टेशन मध्ये 13 मे रोजी दिली होती.